मेढ्यात नगराध्यक्षपदी 'मी' नाही तर आता 'सौभाग्यवती'; गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास
मेढा / दत्तात्रय पवार : मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्यांचा चांगलाच भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आता मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदी ‘मी’ नाही तर ‘सौभाग्यवती’ असा सूर गवसला जाणार आहे. प्रस्थापित नेतेमंडळींना आपल्या सौभाग्यवतींना रणांगणात उतरवण्याची तयारी सुरू करावी लागणार आहे. महिला आरक्षणामुळे मेढा नगरपंचायतीमधील वातावरण पूर्ण ढवळून गेले असून, राजकीय डावपेच सुरू झाले आहेत.
मेढा हे जावली तालुक्याचे मुख्यालय आहे. येथील नगराध्यक्षपदासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. सोमवारी महिलेसाठी येथील नगराध्यक्षपद आरक्षित झाले. आणि अनेकांचा भ्रमनिरास झाला. माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, एसटी कामगार संघटनेचे शिवाजीराव देशमुख, कांतिभाई देशमुख, उद्योजक संतोष वारागडे, ऍड नवनाथ देशमुख, नारायण शिंगटे, सुरेश पार्टे, सचिन करंजेकर, सचिन जवळ अशा अनेकांचे नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. आता मी नाही तर पत्नीस नगराध्यक्ष करण्यासाठी यातील अनेकजण सरसावणार आहेत. त्यामुळे मेढ्याच्या राजकीय वर्तुळात घमासान पाहायला मिळणार आहे.
नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची दांडी गुल झाल्याने आपल्या सौभाग्यवर्तीना कशी संधी मिळेल? यासाठी फिल्डिंग लावण्यासाठी आता धडपड करावी लागणार आहे.
बुधवारी नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. तोपर्यंत ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत सर्वपक्षाची नेतेमंडळी राहणार आहेत. मेढा नगरपंचायत प्रवर्गातील उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. परंतु, महिला आरक्षण पडल्याने आत्ता इच्छुकांची भाऊगर्दी कमी होणार आहे. काही इच्छुकांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रचार यंत्रणा दबक्या आवाजात मतदारांशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे.
मेढा नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून शहराला वेगळ्या पद्धतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मेढ्याची वाटचाल शहरीकरणाकडे सुरु आहे. तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तालुक्यातील अनेक नेते मेढ्याचे राजकारण आपल्याच हातात राहावे यासाठी स्वतःचा गट मजबूत करण्यावर भर देत असतात. यामध्ये वसंतराव मानकूमरे यांचा मोठा प्रभाव मेढा शहरातील राजकारणावर दिसून येत आहे. तर काही नेते हे केवळ मेढा शहरासाठी येणारा नगरविकासचा निधी व येथील कामे मिळवण्यासाठी मेढा शहरातील राजकारण आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करीत गट बांधणी करीत आहेत. त्यामुळे मेढ्याचे थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक यावेळी जोरदार होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक होण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट, काँग्रेस व अपक्ष अशी इच्छुकांची मोठी संख्या वाढणार आहे.
मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे महिला आरक्षण निश्चित झाल्यानंतर आत्ता प्रभाग रचनेत काय आरक्षण पडते? याकडे लक्ष लागून राहिले आहे. नगरसेवक पदाचे आरक्षण सुद्धा दुसऱ्याला जाते की काय? याची धाकधूक इच्छुक उमेदवारांना लागली आहे. त्यामुळे निदान प्रभागात तरी मनासारखे आरक्षण पडावे, यासाठी देव पाण्यात घातले आहेत. इच्छुक खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी आता आपला मोर्चा आपल्या सौभाग्यवतींना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी कशी मिळेल, यासाठी आपआपल्या नेतेमंडीळीकडे फिल्डिंग लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शशिकांत शिंदेंनी लक्ष घातल्याने भाजप व मित्र पक्षांना आव्हान
यावेळची निवडणूक मात्र भाजप मित्र पक्षांसाठी एवढी सोपी राहणार नाही. तालुक्याचे सुपूत्र आमदार शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी तालुक्यात लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मेढा नगरपंचायतीत सुद्धा याची झलक पाहण्यास मिळणार आहे.