
Maratha Leader Manoj Jarange patil with bacchu kadu shetkari andolan in nagpur
Bachchu Kadu Nagpur: मुंबई : महाराष्ट्रामध्ये आंदोलन, उपोषण आणि मागण्या यांनी राजकारण तापवले आहे. दररोज नवीन मागण्यांसह नेते उपोषण करत आहेत. माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडू यांनी सर्व शेतकऱ्यांनी पूर्णपणे कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी आंदोलन छेडले असून आता त्यांच्या आंदोलनाला आणखी बळकटी मिळाली आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी झाले आहेत.
बच्चू कड़ू यांनी शेतकऱ्यांच्या मागणींसाठी नागपूरमध्ये रस्ता रोको आंदोलन केले. यानंतर कडू यांच्यासह हजारो शेतकरी हे नागपूरमध्ये आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला असून सरकारचे प्रतिनिधी हे बच्चू कडूंसोबत संवाद साधत आहेत. दरम्यान, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. जरांगे पाटील हे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि कर्जमाफीवर बच्चू कडू आणि मनोज जरांगे पाटील यांची अनोखी युती दिसून येत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे पूरामध्ये अगदी मुलांचे दप्तर सुद्धा वाहून गेले. शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मी आंदोलनात आलो. आंदोलनावर सरकारने काल डाव टाकला म्हणून मी बाहेर पडलो. षडयंत्राला आणि डावाला प्रतिडावानेच उत्तर द्यावे लागेल. शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकतो आहे. आंदोलन कसं करायचं याचे सल्ले मी देऊ शकत नाही. कारण त्यांचे आंदोलन वेगळे आहे. पण आंदोलनाचा मूळ गाभा हा आंदोलक असतो. आज बच्चू कडू यांची सरकारसोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर काय निर्णय होतो ते बघू, अशी भूमिका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
परसोडीच्या मैदानावर गैरव्यवस्था
बच्चू कडू यांनी देखील जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्याबद्दल भावना व्यक्त केल्या. मनोज जरांगे जरी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे असले, बहुतांशी वैदर्भीय शेतकरी ओबीसी असले, तरी आज जरांगे पाटील शेतकरी हितासाठी या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे इथे त्यांच्या येण्याला जातीच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही, म्हणून जरांगे पाटील यांचं आम्ही स्वागत करतो असेही बच्चू कडू म्हणाले. दरम्यान परसोडीच्या मैदानावर प्रशासनाने कुठलीच व्यवस्था केली नाही, प्रशासन नेहमीच आंदोलकांना आपला शत्रू समजतो त्यामुळेच परसोडीच्या मैदानावर गैरव्यवस्था झाली अशी नाराजी ही बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, ज्यांची सरकारी नोकरी आहे, पेन्शन आहे किंवा जे व्यापारी आहेत, ज्यांनी फक्त गुंतवणूक करण्यासाठी, टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतली आहे, अशा शेतकऱ्यांना मुळीच कर्जमाफी मिळू नये असे बच्चू कडू म्हणाले आहेत. डिजिटल इंडियामुळे प्रत्येकाची खरी आर्थिक स्थिती शोधणे सरकारला आता सोपे झाले आहे. त्यामुळे सरकारने गरजवंत शेतकरी लवकरात लवकर शोधावे आणि त्यांना कर्जमाफी द्यावी अशी अपेक्षाही बच्चू कडू यांनी व्यक्त केली.