
पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार?; सोमवारी घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय
पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच पुणे शहरात महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. पुणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढविण्याबाबत जवळपास स्पष्ट संकेत मिळू लागले असून, त्याच दिशेने पहिले ठोस पाऊल टाकण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची पहिली औपचारिक बैठक येत्या सोमवारी (दि. १५) सकाळी १० वाजता काँग्रेस भवनात होणार आहे.
महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने १५ डिसेंबरनंतर आचारसंहिता लागण्याची चिन्हे असून त्यानुसार नव्या वर्षांच्या सुरुवातीला १४ किंवा १५ जानेवारी रोजी मतदान होऊ शकते. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार का ? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची देखील चर्चा होती. मात्र, येणारी निवडणूक ही एकत्रित लढण्याचे स्पष्ट संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले असून या बाबत पहिली औपचारिक बैठक सोमवारी कॉंग्रेस भवन येथे होणार आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Winter Session : अंतिम आठवडा प्रस्ताव आज; विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्यासह विरोधक विविध प्रश्नांवर आक्रमक
या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांचे पुणे शहरातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढवण्याबाबतची भूमिका, संभाव्य जागावाटप, समन्वय समितीची रचना तसेच संयुक्त रणनीतीवर या बैठकीत प्राथमिक चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.
पुणे शहरात भाजप आणि महायुतीसमोर प्रभावी पर्याय उभा करण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र येणे आवश्यक असल्याची भूमिका आघाडीतील घटक पक्षांकडून सातत्याने मांडली जात होती. त्याला आता प्रत्यक्ष कृतीचे स्वरूप येत असून, ही बैठक म्हणजे महाविकास आघाडीच्या निवडणूक रणनितीची सुरुवात मानली जात आहे. पुणे शहरातील राजकीय समीकरणे लक्षात घेता, महाविकास आघाडी एकत्र आल्यास निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे केवळ पक्ष कार्यकर्त्यांचेच नव्हे, तर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Winter Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप आज वाजणार; ‘हा’ मुद्दा अद्याप प्रलंबितच