विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप आज वाजणार; 'हा' मुद्दा अद्याप प्रलंबितच (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गेल्या सोमवारपासून सुरु झाले. मात्र, आता या अधिवेशनाचे सूप आज वाजणार आहे. प्रथमच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्याशिवाय अधिवेशन पार पडले. आतापर्यंत विधानसभेत विरोधी पक्षनेता नव्हता. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावेळी विधानपरिषदही संपूर्ण काळ विरोधी पक्षनेत्याशिवाय राहिली. रविवारी, अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा असेल.
८ डिसेंबरपासून अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उचलून धरला. परंतु, सभागृहात यावर आक्रमक भूमिका घेतली नसल्याचे चित्र होते. विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष ठरला. त्या पाठोपाठ काँग्रेस व शरद पवार गटाचे आमदार निवडून आले. परंतु, एकाही पक्षाला ५० चा आकडा गाठता आला नाही. तिन्ही पक्षांनी मिळून ५० चा आकडा गाठला नाही. सत्ताधाऱ्यांकडून टक्क्याचा मुद्दा उपस्थित करून विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याचा मान एकाही पक्षाला दिला नाही.
हेदेखील वाचा : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले 44000 कोटींचे पॅकेज; अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती
दरम्यान, शिवसेना (ठाकरे) सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांच्याकडे हे पद येईल, अशी चर्चा होती. परंतु महाविकास आघाडीत या पदावरून एकमत झाले नाही. विधान परिषदेत ठाकरे गटाकडे हे पद असल्याने विधानसभेसाठी यावर काँग्रेसचा डोळा होता. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला पद देण्यास सहमती दर्शविली नसल्याचे सांगण्यात येते.
तीन अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय
गेले तीन अधिवेशन विधानसभेचे कामकाज विरोधी पक्षनेत्याशिवाय झाले. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदही रिक्त होते. विरोधी पक्ष नेत्याशिवायच विधान परिषदेचे कामकाज पार पडले. विधानसभेसाठी भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्ष नेत्यासाठी समोर करण्यात आल्याचे सांगण्यात येते. परंतु अध्यक्षांकडून अद्याप त्याला मंजुरी देण्यात आली नाही तर विधान परिषदेतील नाव अद्याप गुलदस्त्यात असल्याचे दिसते.
दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेताच नाही
सध्या राज्याचे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु आहे. मात्र, यंदा राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचा कार्यकाळ संपला आहे. तर विधान सभेमध्ये विरोधकांनी आवश्यक संख्याबळ न मिळाल्यामुळे विधानसभेमध्ये देखील विरोधी पक्षनेते नाहीत.






