MIM Imtiaz Jalil and Thackeray group's Ambadas Danve meet in Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले असून संसदेमध्ये अद्याप अधिवेशन सुरु आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये अर्थात राज्यसभा आणि लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड सुधारित विधेयक पारित करण्यात आले आहे. यामध्ये ठाकरे गटाने विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केले आहे. मुस्लीम समाजाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून हे विधेयक आणले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची भेट घेतली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून त्यांच्या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही भेट ईदसाठी असून यामध्ये कोणताही राजकीय विषय नसल्याचे मत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे.
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची भेट झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संभाजीनगर शहर काही महानगर नसून अगदी छोटसं शहर आहे. सातत्याने आमच्या भेटीगाठी होत असतात. मागील 25 वर्षांपासून आमचे संबंध आहेत. तरुणपणापासून आमचे दोघांचे वैयक्तिक संबंध आहेत. मागील 25 वर्षांपासून सातत्याने मी जलील यांच्या घरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी येत आलेलो आहे, असे मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजकीय चर्चांवर उत्तर देताना दानवे म्हणाले की, राजकीय चर्चेसाठी मला काही देणेघेणे नाही. इम्तियाज जलील हे पण माझ्या घरी दिवाळीसाठी येत असतात. माणूस चंद्रावर जाऊन पोहचला आहे. आताचे AI चे युग असून, भारतीय भाजपाचे लोकं हिंदू-मुस्लिम घेऊन बसले आहेत. राजकीय संबंधांइतकेच वैयक्तिक संबंधही महत्त्वाचे आहेत, असे स्पष्ट मत अंबादास दानवे यांनी मांडले आहे. यामुळे दोन्ही नेत्यांची ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या भेटीवर इम्तियाज जलील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, लोकशाहीत विविध राजकीय पक्षांचे मतभेद असायला पाहिजे. मात्र, महाराष्ट्राची एक वेगळी राजकीय संस्कृती असून आपण सण उत्सव एकमेकांच्या घरी जाऊन साजरा करत असतो. माझी आणि अंबादास दानवे यांची ओळख महाविद्यालय जीवनापासून आहे. दरवर्षी मी दिवाळीला त्यांच्या घरी जात असतो. ईदला ते माझ्या घरी येत असतात. मात्र, आज रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने असे वातावरण तयार करण्यात आले आहे की, हिंदू-मुस्लिम एकमेकांचे शत्रू आहेत. अंबादास दानवे आणि आमची राजकीय विचारसरणी वेगवेगळी असली तरीही आम्ही शत्रू नाहीत, अशा शब्दांत इम्तियाज जलील यांनी राजकीय चर्चांना पूर्णविराम लावला आहे.