शिरुरमध्ये झोपलेल्या कुटुंबाला सत्तूरच्या धाकाने लुटले (File Photo : Crime)
शिक्रापूर : शिरुर शहरातील पुणे-नगर महामार्गावरून प्रवास करणारे कुटुंब रस्त्याच्या कडेला वाहनामध्ये झोपले होते. रात्रीच्या वेळी चालकाला झोप लागल्याने वाहन कडेला घेऊन कुटुंबातील काही सदस्य झोपले होते. त्यावेळी दोघा अज्ञातांनी त्यांना सत्तूरचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरुर शहरातील पुणे-नगर महामार्गावरून सुलोचना राठोड यांचे कुटुंबीय त्यांच्याजवळील कारमधून चालले होते. त्यावेळी कार चालवणाऱ्या चालकाला झोप आल्याने त्याने येथील बोऱ्हाडे मळा येथे रस्त्याचे कडेला कार लावली. काही वेळ झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास दुचाकीहून दोन युवक आले. त्यांनी दरवाजा वाजवून सर्वांना उठवले. दरम्यान, त्यांच्याजवळील सत्तूरचा धाक दाखवून सुलोचना राठोड या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण तसेच कानातील गोलाकार रिंगा असे सोन्याचे दागिने काढून घेऊन पोबारा केला.
याबाबत सुलोचना दुधाराम राठोड (वय 40, वर्षे रा. उत्तरवाडोना ता. नेर जि. यवतमाळ) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
चोरट्यांनी घातला धुमाकूळ
राज्यात लुटमार करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून लुटमारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी नुकतीच समोर आली होती. एरंडवणे परिसरातील डीपी रस्त्यावर रनिंग करणाऱ्या तरुणाला तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात अलंकार पोलिसांना यश आले. या चोरट्यांकडून तलवार, दुचाकी, दोन सोनसाखळ्या, पेडेंट असा २ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.