भाईंदर/ विजय काते: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्या एका फोटोमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सोशल मीडियावर आयुक्तांचा फोटो शेअर करत त्यांना “शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा” दिल्या. या पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
ही संपूर्ण चर्चा एका कार्यक्रमानंतर सुरू झाली आहे. रविवारी शिवसेना नेते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदर शहरात जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला ठाणे जिल्हाधिकारी कृष्ण पांचाळ, महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा, तसेच इतर विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे फोटो प्रताप सरनाईक यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरुन प्रसारित करण्यात आली. त्यातील एका फोटोत आयुक्त शर्मा हे व्यासपीठावर भाषण करताना दिसत आहेत, आणि त्यांच्या मागे स्पष्टपणे शिवसेनेचे चिन्ह दिसत असल्याने तो कार्यक्रम राजकीय वाटू लागला. हाच फोटो आमदार नरेंद्र मेहता यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर पोस्ट करून आयुक्तांना शिवसेनेत प्रवेशाबद्दल शुभेच्छा दिल्या.
या पोस्टनंतर नागरिक आणि राजकीय नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, “खरोखरच आयुक्तांनी शिवसेनेत प्रवेश केला का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून आमदार नरेंद्र मेहता आणि आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्यात तणावाचे वातावरण असल्याच्या चर्चा होत होत्या. मेहता यांनी सार्वजनिकरीत्या शर्मा यांच्यावर “कामकाजात ढिलाई आणि जबाबदारी न पार पाडणे” असे आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्या या नव्या पोस्टमुळे दोघांमधील वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणी ना आमदार नरेंद्र मेहता यांनी, ना आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, महापालिकेतील अधिकारीवर्ग या वादाकडे संयमाने पाहत आहे. मात्र, शहरातील नागरिकांमध्ये सोशल मीडियावर “हा गैरसमज आहे का की राजकीय संदेश?” या चर्चेने जोर धरला आहे. पुढील काही दिवसांत या घटनेबाबत दोन्ही बाजूंनी स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमातील फोटोआणि सोशल मीडियावरील शुभेच्छा पोस्टमुळे मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा एकदा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांमधील संबंधावर याचा परिणाम होणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.