
तमिळनाडूमध्ये राजकीय भूकंप? 'विजय' यांचे सरकार कधीही कोसळणार (Photo Credit- X)
सोमवारी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना एम. के. स्टॅलिन भावनिक आणि आक्रमक पवित्र्यात पाहायला मिळाले. ते म्हणाले, “तमिळनाडूच्या राजकीय पटलावरून द्रमुकचा सूर्य (पक्षाचे निवडणूक चिन्ह) कधीही मावळणार नाही. यापूर्वीही पक्षाने अनेक पराभव पचवून पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे.” दरम्यान, या निवडणुकीत एम. के. स्टॅलिन यांना त्यांच्या हक्काच्या ‘कोलाथूर’ मतदारसंघातूनही पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या संपूर्ण निवडणूक अपयशाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी आगामी काळात पक्षाची पुनर्रचना करण्याचे संकेत दिले आहेत.
द्रमुकच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांच्या सरकारला अस्थिर करण्यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू आहेत. सध्या सरकारला बाहेरून पाठिंबा देणारे व्हीसीके (VCK), सीपीआय (CPI), सीपीएम (CPM) आणि आययूएमएल (IUML) हे पक्ष जर आपला पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत असतील, तर सरकार अल्पमतात येऊ शकते. अण्णाद्रमुकच्या (AIADMK) बंडखोर आमदारांना जर विधानसभा अध्यक्षांनी किंवा न्यायालयाने अपात्र ठरवले, तर सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ कमी होईल. दुसरीकडे, सत्ताधारी पक्षाच्या सूत्रांनी स्टॅलिन यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. आपल्याकडे पूर्ण पाच वर्षे सरकार चालवण्यासाठी आवश्यक असणारे संख्याबळ असून सरकारला कोणताही धोका नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
राजकारण बदलत चालल्याचे मान्य करत स्टॅलिन यांनी द्रमुकच्या नेत्यांना सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहण्याचा सल्ला दिला. विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाचे सोशल मीडियावरील व्यवस्थापन अत्यंत प्रभावी असल्याचा अप्रत्यक्ष दाखला देत ते म्हणाले, “ज्या राजकारणाची चर्चा कधीकाळी चहाच्या टपऱ्यांवर व्हायची, ती आता सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर होत आहे. त्यामुळे आपल्याला या डिजिटल युगात आघाडी घ्यावीच लागेल.”
द्रमुकच्या या दारूण पराभवाची कारणे शोधण्यासाठी आणि थेट जनतेकडून फीडबॅक घेण्यासाठी स्टॅलिन यांनी ३६ सदस्यांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. पक्षाने आपला पारंपरिक जनाधार कुठे गमावला, याचे आत्मपरीक्षण ही समिती करणार आहे. अभिनेता विजय यांच्या पक्षाने तमिळनाडूमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारल्यामुळे तब्बल ५९ वर्षांनंतर दोन्ही पारंपरिक द्रविडीयन पक्षांचे (DMK आणि AIADMK) वर्चस्व संपुष्टात आले असून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागले आहे.
सध्या तमिळनाडू विधानसभेत विजय यांच्या टीव्हीके पक्षाकडे १०७ जागा असून त्यांना काँग्रेसच्या ५ आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय द्रमुकच्या ४ मित्रपक्षांचाही (प्रत्येकी २ जागा) त्यांना पाठिंबा मिळाला आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना अण्णाद्रमुकच्या २५ बंडखोर आमदारांनीही गेल्या आठवड्यात झालेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी मतदान केले होते, ज्यामुळे सध्या त्यांचे सरकार बहुमतात आहे. मात्र, स्टॅलिन यांच्या दाव्यामुळे राज्यातील राजकीय सस्पेन्स वाढला आहे.