MLA Rohit Pawar' reaction on Ravindra Dhangekar defection Pune Politics
पुणे : पुण्यामध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसचे नेते व कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्ष सोडला आहे. रवींद्र धंगेकर यांनी कॉग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. रवींद्र धंगेकर हे पक्षांतर करणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. अखेर ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधीमंडळाच्या आवारामध्ये आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी रवींद्र धंगेकर यांनी महाविकास आघाडीची साथ सोडल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, “माझं एकच मत आहे की शिंदे साहेबांची जी काही राजकीय बोट आहे ती जड झालेली आहे. क्षमतेच्या बाहेर जायला लागलेली आहे. भाजपचं सुद्धा तसंच झालं आहे. अजित पवार यांचं सुद्धा तसंच झालं आहे. जे लोकांसाठी आणि विकासासाठी काम करणारे लो आहे ते विरोधामध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये रवींद्र धंगेकर यांच्यासारखा सामान्य लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता सत्तेमध्ये जाण्यासाठी अशा पक्षांमध्ये जात असेल आणि विचार बदलत असेल तर ज्यावेळी ते निवडून आले होते लोकांनी त्यांच्या एककडे असणाऱ्या एका विचाराला निवडून दिलं होतं,” असं स्पष्ट मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे रोहित पवार म्हणाले की, “रवींद्र धंगेकर यांच्या कॉंग्रेस सोडण्यामुळे विचारांना गद्दारी केल्यासारखे आहे. जो पर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत यावर खोलामध्ये जाऊन काही सांगता येत नाही. शेवटी विरोधामध्ये राहत असताना सर्व गोष्टी चांगल्या नसतात. माझ्या कारखान्यावर आता कारवाई सुरु आहे. माझ्या विरोधात कारवाई सुरु आहे. बरंच काही माझ्या विरोधामध्ये सुरु आहे. शेवटी विचाराला पक्क राहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण राजकारण हे तीन ते चार वर्षांसाठी आपण करत नसतो. राजकारण हे पुढच्या 30 ते 40 वर्षांसाठी करत असतो. त्यामुळे माझी रवींद्र धंगेकर यांना विनंती आहे की त्यांनी पक्षांतर करण्यापूर्वी विचारांकडे पाहिले पाहिजे. संघर्षाची तयारी ठेवा. कारण पुढचा काळ हा चांगल्या विचारांचा आहे. त्यामध्ये तुमचं नाव नक्कीच अभिमानाने आम्ही घेऊ. आज फक्त सत्तेमध्ये जाण्यासाठी आणि नाराज आहोत हे दाखवण्यासाठी विचार बदलत असताल तर लोक सुद्धा आपल्या पाठीमागे राहणार नाहीत,” असा इशारा आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील नेते रवींद्र धंगेकर यांना दिला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
पुण्यातील नेते रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याच्या मागील अनेक दिवसांपासून होत्या. यानंतर अखेर त्यांनी कॉंग्रेस सोडून शिंदे गटामध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, “लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय आपण जनतेला न्याय देऊ शकत नाही. अशा वेळी दोन तीन वेळा कामानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो, मंत्री उदय सामंत यांच्याशीही चर्चा केली. त्यांनी देखील आमच्यासोबत काम करा अशी विनंंती केली. मतदारसंघातील जनतेशी चर्चा केल्यानंतरही आपल्याला काम तर करावचं लागेल, पण सत्तेशिवाय कोणतीही कामे होणार नाहीत. हेही लक्षात आलंं होतं. त्यामुळे ज्यांच्या चेहऱा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचला आहे, त्यांच्यासोबत काम करण्यास हरकत नाही, असा विचार झाला. त्यामुळे आज मी माझा निर्णय घेतला. आज सायंकाळी मी एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेणार आहे. त्यांच्या भेटीनंतर आमचा निर्णय अधिकृतरित्या जाहीर करू.” मी एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणतीही मागणी केली नाही,” असे मत रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले आहे.