महाकुंभमधील गंगाजलावर टीका करणाऱ्या मनसे राज ठाकरेंवर प्रतिक्रिया (फोटो - नवराष्ट्र)
मुंबई : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा पार पडला. 144 वर्षांनी होणारा हा महाकुंभमेळा सुरुवातीपासून चर्चेमध्ये आला आहे. आता संपल्यानंतर देखील याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडत आहेत. मनसे नेते राज ठाकरे यांनी महाकुंभमेळा आणि त्यामध्ये असणाऱ्या गंगा पाण्यावर वक्तव्य केले. मात्र यामुळे अनेकांची मनं दुखावली गेली असल्याची टीका सत्ताधारी करत आहेत. तर राज ठाकरे कधी तरी खरे बोलले असा टोला विरोधी नेत्यांनी लगावला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.
पुण्यात मनसेच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त खास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाकुंभमेळ्यातील पाण्यावर त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “चार वर्षांपूर्वी कोरोना होऊन गेला. तेव्हा आपण तोंडाला कापड लावून फिरलो. आणि आता कुंभमेळ्यात जाऊन स्नान करतो. देशातील एकही नदी स्वच्छ नाही. परदेशातील नद्या बघा सर्वांनी. गंगा स्वच्छ होणार, हे मी राजीव गांधी यांच्यापासून ऐकत आलो आहे. पण गंगा स्वच्छ झालेली नाही. बाळा नांदगावकर यांनी कुंभमेळ्यातून गंगेचे पाणी माझ्यासाठी आणले होते. पूर्वीच्या काळी ते ठीक होत. पण आता सोशल मीडियावर सर्वांनी पाहिलं आहे तिथे गेलेले महिला पुरुष कसे अंघोळ करत होते. मी त्यांना म्हटले, हड… मी ते पिणार नाहीये. आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत स्पष्ट असले पाहिजे,” अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. यावरुन आता राज्याचे राजकारण रंगले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामधून त्यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, “अधून मधून राज ठाकरे खरं बोलतात. कदाचित मेळाव्यांना चर्चेत ठेवण्यासाठी आणि बातमी मूल्य तयार करण्यासाठी सुद्धा हे असू शकतं मात्र आज राज ठाकरेंनी जे मांडलं ते निश्चितपणे चिंतनीय आहे. कुंभमेळ्याच्या संदर्भाने देशातील नद्यांचे पाणी आणि अस्वच्छता प्रकल्पाबद्दल त्यांनी मांडलेली भूमिका ही दुर्देवाने खरी आहे. ती प्रबोधनकारांच्या डोळस हिंदुत्वाशी सुसंगत आहे. तेव्हा त्याचा विपर्यास करण्यापेक्षा मोदी भक्तांनी आत्मचिंतन करावे,” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र ती सुषमा अंधारे यांच्या प्रतिक्रियेशी सुसंगत नाही. रोहित पवार म्हणाले की, “आम्ही देखील गेलो होतो. आम्ही पण तिथून पाणी घेऊन आलो लोकांना दिलं ते फिल्टर करुन दिलं तर त्यांची ताकद कमी होतं नाही. त्यांनी वक्तव्य करताना क्लिअर केलं पाहिजे होतं की ते प्रदुषणाबद्दल बोलत आहेत. लोकांना भावना दुखावतील असं वक्तव्य त्यांनी टाळलं पाहिजे होतं,” असे स्पष्ट मत आमदार रोहित पवार यांनी वक्तव्य केले होते.