MNS Raj Thackeray reaction on Kalyan dispute of marathi people
कल्याण : मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी होत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. कल्याणमधील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईटसमध्ये या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये परप्रांतीयांकडून मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. यामुळे राजकारण तापले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या प्रकरणावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये कमी लेखले जात असून यावर राज ठाकरे यांनी अनेकदा आवाज उठवला आहे. यामुळे या कल्याणमधील प्रकरणावर राज ठाकरे यांची भूमिका काय याची अनेकांना उत्सुकता लागली होती. मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपली भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला, असे राज ठाकरेंनी लिहिले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे राज ठाकरेंनी लिहिले आहे की, कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला , गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. बरं असं पण नाही की महाराष्ट्रा बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच. पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही!, असे राज ठाकरेंनी लिहिले आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार, आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, हे का घडतं ? कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे. यांना थोडीफार आमिषं दाखवा की हे करतात मतदान आम्हाला! मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलं आहे. आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात, कारण तेंव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो !
अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच ! ‘लाडकी बहीण’च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का? मंत्रिपदं महाराष्ट्राची उपभोगणार परंतू त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार! तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ….
सस्नेह जय महाराष्ट्र, कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण… — Raj Thackeray (@RajThackeray) December 20, 2024
हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे, पण हिंदू म्हणून एकत्र येताना, प्रत्येक राज्यात तिथली भाषा, तिथली स्थानिक माणसं, तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नये. हिंदूत्व आम्ही देखील पुजतो परंतू हिंदूना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लगणार नाही हे देखील आपण पाहिले पाहिजे !
मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका. मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं. बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी, अशी राज ठाकरेंनी मागणी केली आहे.