
नाशिकमध्ये मनसे महाविकास आघाडीसोबत
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. असे असताना महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील राज्यस्तरीय युतीला नाशिकमधून औपचारिक सुरुवात झाली. नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आगामी सर्व निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा केली.
राज्याचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील. मात्र, नाशिकसह संपूर्ण राज्यात मनसेला सोबत घेऊन निवडणुका लढण्याचा निर्धार आघाडीने व्यक्त केला. माकपचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले की, “राज्यात भ्रष्टाचार आणि जातीय भांडणे पसरवणाऱ्या महायुती सरकारला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यासह सर्वच घटक एकत्रितपणे निवडणुका लढवतील”.
नाशिकमधील या घोषणेला राज्यस्तरीय स्वरुप प्राप्त झाले असून, मुंबई महानगरपालिका, ठाणे, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या महापालिकांमध्येही मनसेला सामावून घेण्याची गरज महाविकास आघाडीला भासणार आहे.
ठाकरे बंधूंच्या एकीने युतीत अस्वस्थता
राजकीय विश्लेषकांच्या मते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीमुळे महायुतीला थेट आव्हान उभे राहणार आहे. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) आणि मोठ्या महापालिकांमध्ये दोन्ही ठाकरेंच्या संयुक्त ताकदीसोबत अन्य पक्षांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
हेदेखील वाचा : Local Body Elections 2025: वडगाव नगरपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा उत्साह; नामनिर्देशन प्रक्रिया झाली सुरू
काँग्रेस नेत्यांचा विरोध
मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मतचोरीविरोधातील मुंबईतील मोधर्याला पाठिंबा दिला होता. पण, काँग्रेसचे वरिष्ठ नेते या मोर्चात सहभागी झाले नव्हते, बिहार विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेस अनुकूल नाही. मनसेला सोबत घेतल्यास पराप्रांतीयांच्या मुद्द्यावरून काँग्रेसला बिहार विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. त्यामुळे मनसेला विरोध आहे. मात्र, या निवडणुकीत नेमका फायदा होतो की नाही हे पाहणे गरजेचे आहे.