वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झाली (फोटो - सोशल मीडिया)
वडगाव मावळ : सतिश गाडे : राज्यामध्ये सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांचा उत्साह दिसत असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया आजपासून (दि. १० नोव्हेंबर) सुरु झाली आहे. नामनिर्देशन प्रक्रिया ही वडगाव नगरपंचायत कार्यालयात सुरू झाली. ही प्रक्रिया दि. १७ नोव्हेंबरपर्यंत (रविवार, १६ नोव्हेंबर वगळता) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहणार आहे.
नामनिर्देशन प्रक्रिया सुरु होताच इच्छुकांकडून अर्ज दाखल केले जातात. मात्र नामनिर्देशन आज पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मनिषा तेलभाते व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात एकूण सात टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नामनिर्देशन पथकात वडगाव नगरपंचायत, पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. उमेदवारांना https://mahaseccles.in/ या वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करून नामनिर्देशन व शपथपत्र भरता येणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पहिल्या दिवशी म्हणजेच आज (१० नोव्हेंबर) एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेले नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, निवडणुकीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थिर देखरेख पथक आणि भरारी पथक स्थापन करण्यात आले असून, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ४ वाजता या पथकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक रित्या पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
सर्वसाधारण महिला राखीव – नगराध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवारांमध्ये चुरस
नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून अबोली मयूर ढोरे यांनी आधीच जनसंपर्क मोहीम सुरू केली असून, महिला वर्गातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर भाजपकडून माजी सभापती गुलाब म्हाळसकर यांच्या कन्या अँड मृणाल म्हाळसकर यांनीही प्रचाराची दिशा घेतली आहे. त्यांच्या प्रत्येक प्रभागात गाठीभेटी,आणि महिलांशी संवाद या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जात आहे. मात्र दोन्ही पक्षांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसल्याने स्थानिक स्तरावर “कोणावर विश्वास ठेवावा?” असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित झाला आहे.






