mp amol kolhe gives answer to sanjay raut for targeting sharad pawar
पुणे : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीचे मित्रपक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला. तसेच एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे कौतुक देखील केले. यावरुन मात्र ठाकरे गट नाराज झाला असून थेट नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून शरद पवारांबाबत नाराजी व्यक्त केली. खासदार राऊत म्हणाले की, कोण कोणाला टोप्या घातलंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे. हाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोण-कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे ठीक आहे. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांना अशाप्रकारे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे. आम्हाला वेदना झाल्या, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे.
शरद पवार गटाच्या नेत्यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनी पवारसाहेब आम्हाला देखील राजकारण कळतं अशी टीका केली होती. यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधून खासदार संजय राऊतांना टोला लगावला आहे. खासदार राऊत यांनी अशा पद्धतीने टीका करणे हे दुर्दैव आहे, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले अमोल कोल्हे?
खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. खासदार कोल्हे म्हणाले की, “मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होत असताना केवळ एकनाथ शिंदे साहेबच नाही आणि 14 ते 15 जणांचा सत्कार या कार्यक्रमात होता. कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांस्कृतिक गोष्टी पहायला पाहिजेत असं मला वाटतं. राऊतसाहेबांना इतकं दु:ख झालं असेल, तर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख केला, उद्धव ठाकरे सुद्धा अजित पवारांना भेटले, आपण याला स्टेटसमनशिप म्हणून बघूया. प्रत्येकवेळी राजकारण आणलं तर अवघड होईल, असा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अमोल कोल्हे यांनी दिल्लीचे राजकारण वेगळे असेल अशा संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिले आहे. खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “हे उगाचच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारखं आहे. पवारसाहेबांच्या राजकारणाविषयी बोलण्याची फार कमी जणांची उंची आहे. शरद पवारांना किती राजकारण कळतं हे कुणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की, राजकारणात सुसंस्कृतपणा जपला पाहिजे” असे स्पष्ट मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.