ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसैनिकांना पत्र लिहिले आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. निवडणुकीमध्ये महायुतीचा एकतर्फी विजय झाला. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून मित्रपक्षांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे अनेक नेते हे नाराज असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. यामध्ये आता ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अंबादास दानवे यांनी लिहिले आहे की, शस्त्र व्यापार विश्वात ज्यावर मागे मोठे आरोप झाले असा अभिषेक वर्मा हा शिंदे गटात गेला आणि तो राष्ट्रीय समन्वयकही झाला. मुळात वर्मावर २००६ साली आज शिंदेंचे छत्र असलेल्या भारतीय जनता पक्षाने त्यावर मोठे आरोप केले होते. या आरोपानंतर वर्माने भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांच्यावर खटलादेखील भरला होता. मग आज अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे अडवणींवर भरलेला हा खटला विसरले आहेत की अभिषेक वर्मा हा माणूस त्यांच्या स्मरणातून गेला, असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “विसरले म्हणून की काय भाजपची उपशाखा असलेल्या शिंदे गटात वर्मा सारखे लोक प्रवेश करतात आणि पदही मिळवत आहेत. असे असेल तर लाल कृष्ण अडवाणी यांच्या लढ्याला आज भाजपच्या लेखी शून्य महत्व राहिले आहे!” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
शस्त्र व्यापार विश्वात ज्यावर मागे मोठे आरोप झाले असा अभिषेक वर्मा हा शिंदे गटात गेला आणि तो राष्ट्रीय समन्वयकही झाला. मुळात वर्मावर २००६ साली आज शिंदेंचे छत्र असलेल्या भारतीय जनता पक्षाने त्यावर मोठे आरोप केले होते. या आरोपानंतर वर्माने भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी…
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 12, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ठाकरे गटाने याचबरोबर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या एका कार्यक्रमातील उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांना शरद पवारांनी पगडी देऊन सन्मान केला. त्याचबरोबर शरद पवारांचे त्यांचे कौतुक देखील केले. मात्र ही गोष्ट ठाकरे गटाला आवडलेली नाही. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर थेट आपली नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोण-कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे ठीक आहे. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांना अशाप्रकारे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे. ही आमची भावना आहे, कदाचित पवारांची भावना वेगळी असू शकेल. पण हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नाही. कारण शरद पवारांचा आम्ही आदर करतो”, असा आक्रमक पवित्रा खासदार संजय राऊतांनी घेतला आहे.