MP Sanjay Raut alleges that there is superstition at CM's residence Varsha Bungalow
नाशिक : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. महायुतीला एकतर्फी यश मिळून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर फडणवीस राहायला गेलेले नाही. ठाकरे गटाने आता यावरुन फडणवीसांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. कामाख्या देवीला रेडे कापले त्यांची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून तिथे पुरली आहेत, असा अजब दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभागी होत संसदेमध्ये उपस्थिती लावली. यावरुन टीका करताना खासदार राऊत म्हणाले की, “पंतप्रधानाचे काम आहे त्यानिमित्ताने त्यांना संसदेत यावे लागते. मात्र ते महिनो न महिने संसदेत ते येत नाही. लोकसभा आणि राज्यसभेत यायचे असते विरोधी पक्ष काय बोलतो ते ऐकाचे असते. खासदारांच्या प्रश्नाला उत्तर घ्यायचे असते, गेल्या 10 वर्षांत परंपरा मोडीत काढली होती. पंडित नेहरूवर टीका करतात, पण नेहरु इंदिरा गांधी, नरसिंह राव पूर्ण वेळ संसदेत बसत होते. लोकशाही मजबूत केली, मोदी लग्नाच्या हॉलमध्ये संसद भरवीत आहेत का? बँक्वेट हॉल सारखी संसद केली सरकार सुद्धा येतंय आम्ही जातो ऐकण्यासाठी,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत यांनी शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्याबाबत गंभीर दावा केला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही? मारूती कांबळेचे काय झाले हा आमचा प्रश्न आहे. इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्री चे अधिकृत निवासस्थान आहे तिथे मुख्यमंत्री का जात नाही?याचे उत्तर लिंबु सम्राटने द्यावे शिंदे गटातल्यांनी दिले आहे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे राऊत म्हणाले की, “बीजेपीच्या गटात चर्चा आहे, कामाख्या देवीला रेडे कापले त्याच शिंग पुरले आहेत. लॉनमध्ये खोदकाम करून असा स्टाफ आणि त्यांचे लोक सांगतात. आमचा विश्वास नाही पण मंतरलेले शिंग आणेल, मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू नये यासाठी असे आम्ही ऐकले आहे. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पळणारी लोक आहोत. आम्ही मुद्दा लावून धरत आहोत, काहीतरी वेगळे घडू शकते नेमके काय झाले? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे? ते का अस्थिर अस्वस्थ आहेत?” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्र पुरोगामी आहे, अंधश्रद्धा निर्मूलनसाठी काम करणारे सर्वजण यांनी महाराष्ट्र मधून अंधश्रद्धा निर्मूलनसाठी काम केले. तरीही महाराष्ट्रमध्ये अंधश्रद्धा कायम आहे. उदय सामंत हे सुद्धा कोकणातले आहे,त्यांच्याकडे ताकद असेल तर त्यांनी त्याचे काम करत रहावे आम्ही आमचे काम करत राहू,” असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले आहे.