Photo Cedit- Team Navrashtra
मुंबई: मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिलेल्या एका यूट्यूब मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र वाद निर्माण झाला आहे. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते आणि त्यासाठी पुरावेही उपलब्ध असल्याचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे शिवप्रेमी आणि राजकीय नेत्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
सोलापूरकर यांनी “शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते, पेटारे-बिटारे काहीच नव्हते” असा दावा केला. “मोहसीन खान किंवा मोईन खान नावाच्या सरदाराकडून महाराजांनी सही-शिक्क्याचे पत्र घेतले होते आणि त्या परवान्याच्या आधारे महाराज आग्र्यातून बाहेर पडले.” तसेच, “स्वामी परमानंद पाच हत्तींसह आग्र्यातून बाहेर पडले होते, याचीही पुरावे उपलब्ध आहेत,” असा उल्लेख त्यांनी केला.
या विधानावर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून, राजकीय वर्तुळातही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नेत्यांनी सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून, इतिहासाच्या विकृतीकरणाचा आरोप केला आहे. या वादग्रस्त विधानामुळे शिवप्रेमी आणि राजकीय नेत्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
जास्त पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी ठरेल घातक? जाणून घ्या शरीरासाठी नियमित किती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून सोलापूरकरांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी लिहिले, “छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन सुटले, असे इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मूर्ख माणूस महाराष्ट्राला इतिहास शिकवत आहे. महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. शिवप्रेमी हे सहन करणार नाहीत.”
तसेच, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही जोरदार टीका करत लिहिले, “राहुल सोलापूरकर यांनी विकृत मानसिकतेतून इतिहासाची मोडतोड केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वकर्तृत्वावर आग्र्यातून निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला आहे. जाणीवपूर्वक महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोलापूरकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी मी सभागृहात मागणी करेन.” या विधानावर सर्व स्तरांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, शिवप्रेमींमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.