
MP Sanjay Raut on Raj Uddhav Thackeray alliance in mumbai BMC Elections 2025
Thackeray Brothers alliance : मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहे. देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. मागील 25 वर्षांची सत्ता कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचे सगळे हेवेदावे विसरुन हातमिळवणी केली. ठाकरे बंधूंच्या या एकत्रित येण्यावर मराठी माणसांनी उत्सुकता दाखवली. यानंतर आता निवडणुकीमध्ये देखील हे दोन भाऊ एकत्र लढणार आहेत. मात्र अद्याप युती जाहीर केली नसून याबाबत खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केले.
हिंदी भाषा सक्तीवरुन ठाकरे बंधू हे एकत्र आले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित सभेवर जोरदार चर्चा झाली. याचे रुपांतर मतांमध्ये करण्यासाठी ठाकरे बंधू तयारी करत आहेत. आता मुंबई पालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी युतीच्या घोषणेबाबत वक्तव्य केले. खासदार राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात जागावाटपासंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मुंबई ही अतिशय महत्वाची आहे, कालही आमची सविस्तर चर्चा झाली आणि बहुतेक आज या चर्चेला पूर्णविराम मिळेल. कालही बराच वेळ मनसे आणि शिवसेनेचे नेते हे अंतिम चर्चेसाठी बसले, आज मुंबईचा विषय संपेल अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय ठाणे, डोंबिवली, पुणे, नासिक इथेही अंतिम टप्प्यात आहे चर्चा, येत्या 1-2 दिवसांत सगळं फायनल झाल्यावर उद्धव ठाकरे आणि राज हे बसून बोलतील. तुम्हाला ज्या घोषणेची (युतीच्या) उत्सुकता आहे, ती घोषणा होईल, असे सूचक विधान खासदार राऊत यांनी केले.
हे देखील वाचा : ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून हारलो…! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बरळले
पुढे ते म्हणाले की, काही झालं तरी आमच्यात कोणताही विसंवाद, गोंधळ नाही, महा-महायुतीमध्ये जे चाललंयं, तसं आमच्याकडे अजिब्बात नाही. आमचं घर दोघांचं आहे असा टोला राऊतांनी लगावला. आता काँग्रेस सोबत नाही, त्यांना स्वबळ दाखवायचं आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा होईल. पण शिवसेना आणि मनसे हे मुख्य पक्ष आहेत, त्यांची आघाडी होईल. आणि हीच आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करेल. महाराष्ट्र आणि मुंबईला जागं करण्याचं काम ही आघाडी नक्की करेल, असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : ‘…म्हणून आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही’; ऐन महापालिका निवडणुकीतच आशिष शेलारांचं मोठं विधान
शिवाजी पार्कवर घुमणार ठाकरेंचा आवाज
शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये युती झाल्यानंतर मुंबईमध्ये प्रचाराचा धुराळा उडणार आहे. शिवाजी पार्क हे नेहमीच ठाकरे कुटुंबासाठी महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे दोन्ही नेते हे शिवाजी पार्कवर सभा घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. राज व उद्धव हे दोघेही शिवाजी पार्क येथे एकत्रित सभाही घेऊ शकतात, शक्तीप्रदर्शन करू शकतात अशी चर्चा होती. मात्र ते दोघेही एकाच व्यासपीठावर दिसणार का असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला. तेव्हाही त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. “आत्तापर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कितीतरी वेळा एकत्र आले आहेत ना, डोममधल्या पहिल्या कार्यक्रमापासून ते अनेकदा एकत्र दिसले आहेत,एकमेकांच्या घरी गेले, एकत्र चर्चेला बसले. यापेक्षा अजून वेगळं काय म्हणायचं आहे ? असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले.