'...म्हणून आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही'; ऐन महापालिका निवडणुकीतच आशिष शेलारांचं मोठं विधान (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार, अनेक पक्षांकडून जोरदार तयारीही केली जात आहे. असे असताना आता भाजप नेते आशिष शेलार यांनी युतीबाबत मोठं विधान केले आहे. ‘नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत मुंबईत आम्ही युती करू शकत नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची मुंबई महापालिका जागावाटपाबाबत एकत्रित बैठक भाजपच्या दादर येथील कार्यालयात पार पडली. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आशिष शेलार म्हणाले, ‘मुंबईचा आमचा महापौर हा मराठीच असेल, उद्धव ठाकरे यांनी सांगावे की त्यांचा महापौरपदाचा उमेदवार कोणत्या गल्लीतून, मोहल्ल्यातून येईल, असा टोला लगावला’. तसेच आमचा फॉर्म्युला ठरला आहे, आमचा आकडाही ठरला आहे. महायुतीचे 150 प्लस नगरसेवक मुंबईत निवडून आणायचे यावर आमचे एकमत झाले असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.
हेदेखील वाचा : Thackeray Brothers Alliance : निवडणूक जाहीर झाली पण ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
दरम्यान, आमचा आकडा, फॉर्म्युला सगळे काही ठरले आहे. भाजप-शिवसेना तसेच आमचे सर्व मित्रपक्ष मिळून कोणी कुठे लढल्यानंतर १५० प्लस जाऊ याच्या अभ्यासासाठीच ही बैठक झाली. पुढील एक-दोन दिवसांत पुन्हा बसून ठरविणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
अमित साटम यांच्यासह अनेकांची उपस्थिती
भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, प्रविण दरेकर उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाकडून योगेश कदम, राहुल शेवाळे आदी उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली.
मुंबईचा महापौर मराठीच असेल
मुंबई मराठी माणसाचीच आहे, महाराष्ट्राचीच आहे. चंद्र-सूर्य तारेअसेपर्यंत ती मराठी माणसाचीच राहिल. ज्यांच्याकडे आता मुद्दे उरलेले नाहीत, तेच हे भ्रम पसरविण्याचे काम करत आहेत. मुंबईचा महायुतीचा महापौर हा मराठीच असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा महापौर कोणत्या मोहल्ल्यातून येणार आहे हे सांगावे असेही ते म्हणाले.
…आता त्यांना घरी बसवणार
मराठी माणसाने आता शुभमुहूर्त काढला आहे. पंचवीस वर्षे ज्यांनी खाल्ले त्यांना आता घरी बसविण्यात येणार आहे. आम्ही त्यांना शंभर प्रश्न विचारणार असल्याचेही शेलार म्हणाले.
हेदेखील वाचा : महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार; काँग्रेसची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक






