सोलापूर खासदार प्रणिती शिंदे भाजप प्रवेश करणार असल्याचा आंबेडकरांचा दावा आहे (फोटो - सोशल मीडिया)
वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. सुजात आंबेडकर म्हणाले की, “या निवडणूकीच्या आधी प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या, ऑक्टोबर महिन्यातच त्या प्रवेश करणार होत्या. मात्र,देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं की,थांबा तीन महत्वाच्या निवडणुका येतायत,नगरपालिका,महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतायत. तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा” असा मोठा गौप्यस्फोट सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
हे देखील वाचा : दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा
पुढे ते म्हणाले की, “त्यानंतर प्रणिती ताई काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश करतील अशी प्रणितीताई आणि देवेंद्र फडणवीस यांची डील झालेली आहे. तुम्हाला भाजपला पाडायचा असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय तुमच्या समोर आहे. यांची भाजपसोबतची नाती खूप आतपर्यंत आहेत. 2 ते 3 महिन्यांपूर्वी सुशील कुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफच्या लग्नात शरद पवार,गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस हे तीन चीफ गेस्ट होते” असे देखील स्पष्ट मत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
हे देखील वाचा : ‘त्यांनी मला शिवी नाही दिली तर मुंबईच्या…’, उद्धव ठाकरेंवर अमित साटम यांचा हल्लाबोल
पुढे ते म्हणाले की, “भाजप आणि काँग्रेस समोरासमोर EVM आणि रस्त्यावर लढायचं फक्त नाटक करतात. मात्र यांचे बिजनेस एक, यांची लग्न एक, यांचे नातेगोते एक यांचे सर्व धंदे एक आणि प्रणिती ताईने प्रवेश घेतला की यांचा पक्ष सुद्धा एक. म्हणून काँग्रेसच्या नादाला लागू नका,तुम्ही काँग्रेसला मत दिलं म्हणजेच भाजपाला मत दिल्यासारखं होतं. हे मी अख्ख्या महाराष्ट्राच्या काँग्रेस बद्दल बोलत नसून तुमच्या सोलापूर बद्दल बोलत आहे. कारण सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार या भाजपसाठी काम करतात हे अख्या जगाला कळून चुकलं आहे” असा घणाघात सुजात आंबेडकर यांनी केला आहे.






