supriya sule reaction on cm devendra fadnavis kafanchori alligation
Kafanchori in mumbai : पुणे : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून आरोप प्रत्यारोप देखील वाढले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एका भाषणामध्ये महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र डागले. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. याचबरोबर मुंबईमध्ये कोरोना काळामध्ये कफनचोरी झाली असल्याचा गंभीर आरोप केला. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे हा पुणे दौऱ्यावर आल्या असून त्यांनी अनेक प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “ज्या पद्धतीने पुण्याचा विकास होत होता तो होत नाहीये. महाराष्ट्र सरकारचा डाटा देखील सांगत आहे. हिंजवडीच्या प्रश्नासाठी दर पंधरा दिवसाला मीटिंग घेते तरी देखील प्रश्न सुटत नाहीयेत. प्रशासनाने जे निर्णय घेतले पाहिजे ते घेतले जात नाहीयेत, हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे. अर्बन प्लॅनिंगमध्ये विस्कळीतपणा आला आहे. ज्या गतीने काम होईला पाहिजेत ती काम होत नाहीत. महापालिका आयुक्तांसोबत वाहतूक कोंडीचा रिव्ह्यू आयुक्तांसोबत घेणार आहे,” अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईमध्ये कोरोना काळामध्ये मोठा घोटाळा झाला असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री फडणवीस यांचे आरोप हे खूप दुर्दैवी आहेत. आता त्यांच्यासोबत असणारी यातली अर्धी टीम उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये होती. पण मला मुख्यमंत्र्यांकडून अशी अपेक्षा नाहीये. जर काय घोळ झाला असेल तर चौकशी करा. ज्या पद्धतीने काल टीका टिप्पणी झाली ती खूप दुर्दैवी आहे,” अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या आरोपाची कसून चौकशी करावी अशी मागणी देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत मूदतवाढ देण्यात आली आहे. येत्या 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूका घेण्यात याव्या अशा सूचना सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिल्या आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “दर तीन महिन्याला निवडणुका पुढे जात आहेत. सत्तेचं विकेंद्रीकरण पंचायतराज हा गाभा आहे. सत्ता केंद्रित राहता कामा नये त्याच विकेंद्रीकरण झालं पाहिजे. या सगळ्याला मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे सरकार तुमचं व्यवस्थित चालू आहे तर मग का असं होत आहे,” असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले होते मुख्यमंत्री फडणवीस?
सभेमधील भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेवर सत्ता करणाऱ्यांवर अपेक्षा होती की, “तुम्ही सामान्य माणसांची व्यवस्था करा, ऑक्सिजन द्या, बेड उपलब्ध करुन द्या. पण त्याहीमध्ये त्यांनी आपल्या नातेवाईकांना कंत्राट मिळवून दिली. ह्यांच्या नातेवाईकांनी माणसं मारली. कोविडच्या काळात ज्यावेळेस सामान्य माणसं मरत होती तेव्हा सामान्य माणसांना बेड मिळत नव्हते. माझा सर्वसामान्य मुंबईकर हा जनावरासारखा मेला. माझ्या मेलेल्या मुंबईकराच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे नालायक, ह्यांनी त्या मुंबईकराचं शव ज्या बॉडी बॅगमध्ये न्यायचं त्या बॉडी बॅगमध्ये घोटाळा केला, हे कफनचोर आम्हाला काय सांगणार? हे कफनचो, ज्यांनी कफनमध्यो चोरी केली, हे कफनचोर मुंबईकरांसमोर कोणत्या तोंडाने मुंबईकरांसमोर येतात?” असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.