मुंबई/ सिद्धेश प्रधान : २००४ ते २०१४ च्या यूपीए सरकारच्या काळात केंद्र व राज्य पातळीवर अनेक प्रकारचे कर होते. काही करांचे नियंत्रण केंद्र तर काहींचे नियंत्रण राज्य सरकार करत होते. मात्र सुसूत्रता नव्हती. २०१७ साली जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे अनेक प्रकारचे जे कर होते ते एकाच ठिकाणी आणले गेले. त्यामुळे करप्रणाली सोपी झाली आणि सुसूत्रता आली. अशा प्रकारचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतले ते क्रांतिकारी आहेत. त्याचा परिणाम पुढील ५-१० वर्षात दिसेल आणि जगातील सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत देश आगामी काळात एक पाऊल पुढे जाईल, असा विश्वास भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.
सर्वसामान्य नागरिकांना जीएसटी २.० बद्दल अधिक माहिती मिळावी यासाठी भाजपा मागाठाणे विधानसभेच्या उत्तर आणि मध्य मंडळातर्फे शुक्रवारी बोरिवली पूर्व येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला भाजपा गटनेते व स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच भाजपा मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा प्रवक्ते गणेश खणकर, मा. मंडळ अध्यक्ष आप्पा बेलवणकर, भाजपा उत्तर मुंबई जिल्हा सचिव मोतीभाई देसाई, मयुरी बंगेरा यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आ. दरेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जीएसटी कर प्रणालीत सुधारणा करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. जीएसटीच्या माध्यमातून जे पैसे उभे राहिले त्यामुळे अनेक गोष्टी देशाच्या विकासासाठी करू शकलो. देशाला आर्थिक स्रोत कराच्या माध्यमातून असतो. जर करच मिळाला नाही तर देशाचा सर्वांगीण विकास कमी पडतो. गेल्या दशकात वाढत्या कर पायामुळे ज्या राजकीय प्राधान्याच्या गोष्टी होत्या त्यांना थेट निधी मिळाला. पायाभूत सुविधांत ६० टक्के, विमानतळांचे दुपटीकरण झाले, मेट्रो लाईनचे चौपटीकरण व १४४ वंदे भारत रेल्वे गाड्यांचे पुनर्जीवन केले गेले ते केवळ जीएसटीच्या माध्यमातून पैसे मिळाले म्हणूनच झाल्याचे दरेकरांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या दोन दशकांचा इतिहास व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन टर्मचा विचार केला तर आपण काँग्रेसच्या शेकडो पटीने पुढे आहोत. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी आपली अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. मोदींच्या कारकिर्दीत आपण जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनून पुढे आलोत. आगामी काळात आपला भारत देश जगातील तिसरी अर्थव्यवस्था होईल. केवळ राजकारणाच्या लोकप्रियतेसाठी मोदी काम करत नाहीत तर कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. तेच नेतृत्व सक्षम असते जे कठोर निर्णय घेते. काँग्रेसने जे पाप वाढून ठेवलेय ते पाप आजची पिढी भोगतेय. पुढच्या पिढीला हे पाप भोगावे लागू नये हा दूरदृष्टी विचार करणारे आपले नेते पंतप्रधान मोदी असल्याचेही दरेकर म्हणाले.
जीएसटी सुधारणेवर बोलताना दरेकर म्हणाले की, जीएसटीमध्ये १२ टक्के श्रेणी होती. त्यात ९९ टक्के जनता व वस्तू येतात व २८ टक्के जी श्रेणी होती त्यात ९० टक्के वस्तू येतात. त्याच्या दरात कपात केलीय. याचा अर्थ ९० ते ९९ टक्के घटक हा झालेल्या बदलात लाभार्थी आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. जीएसटी कपातीचे चांगले परिणाम वेगवेगळ्या घटकांवर होत असतात. निरोगी व मजबूत भारतासाठी मोदींची वचनबद्धता जीएसटी कपातीतून दिसून येते. शेतकऱ्यांची सेवा करत असताना त्यालाही जीएसटी कपातीतून दिलासा देण्याचे काम करण्यात आलेय. जीएसटी दरात कपात झाल्याने त्याचा लाभ समाजातील वेगवेगळ्या घटकांना होत असतो, असेही दरेकर म्हणाले.
काँग्रेसवर निशाणा साधत दरेकर म्हणाले की, राजकारणात सौजन्य पाहिजे. एवढा क्रांतिकारी निर्णय मोदींनी आणि आपल्या सरकारने घेतलाय. चांगल्या गोष्टींचे विरोधकांनी कौतुक करायला पाहिजे. काँग्रेसच्या काळात ज्या गोष्टी चांगल्या झाल्या त्याचे कौतुक आपण केले. इंदिरा गांधी यांचे काही निर्णय देशाच्या विरोधात असतील पण काही चांगले निर्णय गरिबांच्या कल्याणासाठी होते त्याचेही कौतुक केले. परंतु काँग्रेसचे नेते साधे सौजन्यही दाखवत नाही. आज जीएसटीच्या सुधारणांमुळे पुस्तक, रंगीत पेन्सिल, खोडरबर यांसारख्या आवश्यक वस्तू पूर्णपणे करमुक्त झाल्यात. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य माणसाची वाढत्या महागाईतून सुटका झाली असल्याचेही दरेकर म्हणाले.