'...त्यांचा ज्योतिषच बोगस'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल(फोटो - सोशल मीडिया)
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका आता लवकरच घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. त्यात शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संभाजीनगरमध्ये जाहीरसभा झाली. यामध्ये त्यांनी अडीच वर्षात आपण काम केलं आहे. त्यामुळे आपण महायुती म्हणून लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली आणि आता जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समितीही जिंकून दाखवा. सगळीकडे भगवा फडकवा, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.
येथील संत एकनाथ रंगमंदिरात शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्याला ते संबोधित करत होते. मेळाव्याला पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, संजना जाधव, रमेश बोरनारे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी, कार्यकत्यांनी प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर, मात्र पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम
दरम्यान, या मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, विरोधक हंबरडा मोर्चा काढणार आहे. हंबरडा कशाला फोडणार? आम्ही ३२ हजार कोटी दिले आहेत. अशावेळी राजकारण कशाला करताय ? तुम्ही हंबरडा २०२२ मध्ये फोडला, खुर्ची गेली तेव्हाही हंबरडा फोडला. सगळे गेलं, काही राहील नाही. पण आता मुंबई बाकी आहे. त्यासाठी आवाज बाकी ठेवा. तेव्हा तुम्हाला हंबरडा फोडावा लागणार आहे.
हंबरडा फोडणारे उरलेच कोण?
आता त्यांच्याकडे हंबरडा फोडणारे उरलेच कोण आहेत? मुंबईला सोन्याची कोंबडी म्हणून तुम्ही पाहिले पण आम्ही मुंबईमध्ये कामे केली. जनता हे सगळं पाहत असून काम करणाऱ्यांच्या मागे जनता उभी राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
त्यांचा ज्योतिषच बोगस
महायुती सरकार निवडून आल्यानंतर हे सरकार आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल असे विरोधकांकडून सतत टोमणे मारले जात होते. मात्र, त्यांचा ज्योतिष बोगस होता. पण शिवसैनिक जेव्हा पेटतो तेव्हा विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहत नाही हा संभाजीनगरचा इतिहास आहे. त्यामुळे आता कोण कोणासोबत युती करतीये याची चिंता घेऊ नका. याचे सर्व गणिते आपल्याकडे आहेत.
कार्यकर्तेच तुम्हाला निवडून देतात
आतापर्यंत नेत्यांच्या निवडणुका होत्या. आता कार्यकत्यांच्या निवडणूक आहेत तेव्हा यादीवर लक्ष ठेवा, त्याचा अभ्यास करा. यादीत नाव नसेल तर ते टाकून घ्या, दुबार नावे असतील ते कमी करा, याचे प्रशिक्षण आज सर्वांना दिले असून याचा वापर करा, असे आवाहन त्यानी कार्यकत्यांना केले.
जबाबदारी शिवसेनेकडे
उपमुख्यमंत्री शिदे म्हणाले, अतिवृष्टीमुळे ठरलेले लग्न थांबले आहेत, शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे अशा पीडित शेतकऱ्यांच्या मुलांचे ठरून थांबलेल्या लग्नाची जबाबदारी शिवसेना घेत असल्याचेही शिंदे यानी जाहीर केले.
हेदेखील वाचा : Eknath Shinde News:निवडणुकीपूर्वी नगर विकास खात्याकडून ७५० कोटींचे मोठे निधी वाटप; शिंदेसेनेसह, भाजप आमदारही खुष