
ncp ajit pawar large number of candidates for the local body elections Vadgaon Maval Political News
वडगाव मावळ: सतीश गाडे: राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकींमध्ये तळागळातील नेते कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून इच्छुकांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. वडगाव मावळमध्ये इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेत तारी सुरु केली आहे. वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारांची चढाओढ सुरू झाली आहे. नगरसेवक पदासाठी तब्बल ४८ इच्छुकांचे अर्ज, तर नगराध्यक्ष पदासाठी ४ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे येणारी निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
अर्जांची सादर प्रक्रिया पूर्ण
वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण ढोरे यांच्याकडे इच्छुकांचे अर्ज प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे, येत्या काही दिवसांत आढावा बैठक घेऊन अंतिम उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी उमेदवारी दाखल केल्याने पक्षांतर्गत चर्चा जोरात सुरू आहे. वडगाव मावळमध्ये राष्ट्रवादी पक्षाकडे इच्छुकांची मोठी गर्दी असून इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार सुनील शेळके यांची डोकेदुखी वाढली
या अर्जांच्या संख्येमुळे आमदार सुनील शेळके यांच्यासमोर आता उमेदवार निवडीत तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. अनेक कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी आपापल्या समर्थकांसाठी तिकीटाची मागणी करत असल्याने शेळके यांची डोकेदुखी वाढणार आहे, असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
स्थानिक राजकारणात उत्सुकता
वडगाव नगरपंचायतीतील नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला जागेसाठी आरक्षित असल्याने या वेळची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणती महिला उमेदवार अंतिम फेरीत जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भाजप व इतर पक्षांचीही तयारी जोमात सुरू असून, वडगावची निवडणूक या वेळी राजकीय रंगत वाढविणारी ठरणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षांपुरतीच मर्यादित असलेली राजकीय चर्चा आता अधिक व्यापक झाली आहे. मावळ तालुक्यातील काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी हे पाच पक्ष एकत्र येऊन महाविकासआघाडीच्या माध्यमातून एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे. या संदर्भात सोमवारी (दि. २७ ऑक्टोबर) तळेगाव दाभाडे येथे महाविकासआघाडीच्या घटक पक्षांच्या तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेना (उबाठा) चे तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते.