ncp leader sharad pawar reaction on uddhav and raj thackeray morcha for marathi language
पुणे : राज्यामध्ये पुन्हा एकदा हिंदी विरुद्ध मराठी अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादण्याचे प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप विरोधी राजकीय पक्षांकडून केला जात आहे. महायुती सरकारने प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा ही पर्यायी भाषा ठेवली आहे. शासन आदेशातील अनिवार्य शब्द काढून टाकण्यात आला असला तरी पर्यायी भाषेच्या आडून महाराष्ट्रावर हिंदी भाषा सक्ती केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्ष आक्रमक झाला आहे. यावर आता जेष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
जेष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील मराठी आणि हिंदी भाषेच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, “माझ्यामते प्राथमिक शिक्षणात हिंदीच सक्ती नसायला हवी. असाच सगळ्यांचा आग्रह आहे. इयत्ता 5 वीनंतर हिंदी शिकवायला काही हरकत नाही. लहान मुलांवर भाषेचा लोड किती द्यायचा, याचा विचार करावा लागेल,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे शरद पवार म्हणाले की, “मातृभाषा मागे पडली तर ते योग्य नाही. सरकारने हट्ट सोडावा. मातृभाषा हीच महत्त्वाची असायला हवी. इयत्ता 5 वीनंतर काय शिकायचं हे कुटुंबातील लोक निर्णय घेतील,” अशी स्पष्ट भूमिका जेष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मुंबईमध्ये मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व नेत्यांनी, साहित्यिक, कलाकार, लेखक अशा सर्व मराठी माणसांनी सहभागी व्हावे असे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले आहेत. तसेच राजकीय पक्ष सोडून या मोर्चामध्ये सहभागी व्हावे अशी भूमिका राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहेत. तसेच भाजपमधील देखील अस्सल मराठी माणसांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत शरद पवार यांना प्रश्न करण्यात आला. शरद पवार म्हणाले की, “मी ठाकरे बंधूंचं स्टेटमेंट पाहिलं आहे. ते काहीही चुकीचं बोलले नाहीत. कोणत्या स्टेजला हिंदी हवी आणि नकोय हे त्यांनी सांगितलं. मोर्चाबाबत मला अजून कोणी सांगितलेलं नाही. हिंदी सक्तीचा विषय कुणी एक पक्ष हाती घेऊ शकत नाही. आम्ही अन्य पक्षांशी बोलणार आहोत.आमचा विचार निगेटिव्ह नाही,” अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे शरद पवार हे सामील होणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.