खासदार संजय राऊत यांनी बबनराव लोणीकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर हे सध्या चर्चेममध्ये आले आहेत. लोणीकर यांनी ट्रोलर्सवर टीका करताना मतदारांबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांनी सरकारी योजना आणि अगदी पीक देखील पंतप्रधान मोदी देत असल्याचे वक्तव्य केले. यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. विरोधातील नेत्यांनी बबनराव लोणीकर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन लोणीकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी लोणीकर यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की,”ते फक्त आता हेच सांगायचे बाकी राहिले आहेत की महाराष्ट्राचा जन्म मोदी यांच्या मुळे झाला. महाराष्ट्राला मुंबई नरेंद्र मोदींमुळेच मिळाली, अकरा कोटी जनतेचा जन्म मोदींमुळे झाला. हे महाशय कधी काळी काँग्रेस पक्षात होते. आणि मोदींमुळे जन्म झाला असेल आणि सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हा एकंदरीत निवडून दिलेल्या सरकारचा महाराष्ट्राच्या अस्मितेचा एक अपमान आहे. खरं म्हणजे या महाशयांनी पहलगाममध्ये जो 26 माय भगिनींचे कुंकू पुसले ते सुद्धा मोदी यांच्यामुळेच पुसले हे सांगितलं असतं तर सत्याला किनार मिळाली असते. पहलगाममध्ये ४० जवांनाच्या हत्या झाल्या त्या देखील मोदींमुळेच,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे भारताला माघार घ्यावी लागली तीही मोदी यांच्यामुळेच. मुंबईतल्या मोक्याचे भूखंड अदानीला दिली जात आहेत मराठी माणसाच्या घशातून काढून तेही मोदी यांच्यामुळेच. काल आपण पाहिले असेल शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यांच्या जमिनी हिसकून काढत आहेत. बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आपल्या या राज्याची जनता स्वाभिमानी आहे. ती लाचार नाही हे जर बबनराव लोणीकर यांना कळत नसेल तर, अशा प्रकारची लोक भारतीय जनता पक्षात आहेत. हे या महाराष्ट्राने समजून घेतले पाहिजे. जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजत आहेत, मोदींच्या चरणाचे दास समजत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माळेगाव साखर कारखाना निवडणूक राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. यामध्ये अजित पवार यांच्या पॅनलने बाजी मारली. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “एका कारखान्याची चेअरमन अर्थमंत्री बनतात हे एक मोठी गोष्ट आहे. बघा शरद पवार यांच्या पॅनलचा पराभव केला वेगळी गोष्ट आहे. 500 कोटींचे आमिष दाखवून. हे पैसे अजित पवार खिशातून थोडी देत आहेत. हे सरकारच्या तिजोरीतून देणार आहे ना, राज्यावर कर्जाचा भर वाढत आहे. याला भ्रष्टाचार म्हणतात,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.