ncp sharad pawar group morcha against gopichand padalkar controversial statement
Maharashtra Politics : सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या वडिलांचा उल्लेख करत खालच्या पातळीची टीका केली होती. यामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले. विरोधी नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारवाईची मागणी केली. जयंत पवार यांच्यावर टीका केल्यामुळे जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांना फोन करुन नाराजी उघड केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची कानउघडणी केली. याच पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सांगलीमध्ये मोर्चा काढत तीव्र विरोध दर्शवला जात आहे.
राजारामबापू पाटील, त्यांचे पुत्र आमदार जयंत पाटील यांच्या विरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह टीकेचा निषेध करण्यासाठी आज (दि.22) सोमवारी सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राज्यातील दिग्गज नेते सांगलीत येणार आहेत अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी दिली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देवराज पाटील म्हणाले की, आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात केलेले वक्तव्य हे निंदनीय आहे. सर्वच स्तरातून त्याचा निषेध केला जात आहे. त्याच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी स्वर्गीय राजारामबापू पाटील आणि स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या विचाराला मानणारे सर्व कार्यकर्ते एकवटतील, असा विश्वास व्यक्त केला.
पुढे देवराज म्हणाले की, “जत पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणावरील लक्ष हटविण्यासाठीच आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे सांगलीची आणि महाराष्ट्राची संस्कृती वाचविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार विशाल पाटील, खासदार बजरंग सोनवणे, खासदार निलेश लंके, खासदार अमोल कोल्हे, आमदार विश्वजित कदम, उत्तम जानकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, आमदार रोहित पाटील, भास्कर भगरे आणि अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणराजे होळकर सहभागी होतील. त्यांच्या नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात होईल.”
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
देवराज पाटील म्हणाले की, “सांगतील हा मोर्चा कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथून सुरु होईल, राममंदिर चौक, पंचमुखी मारुती रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कापडपेठ, भारती विद्यापीठमार्गे स्टेशन चौकपर्यंत काढण्यात येईल. त्यानंतर सर्वच नेते मोर्चाला मार्गदर्शन करतील.” यावेळी पक्ष निरीक्षक शेखर माने, संजय बजाज, सागर घोडके आदी उपस्थित होते.
सत्ताधारी पक्षाचे नेतेही नाराज
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध सत्ताधारी गटाच्या नेत्यांनीही केला आहे. खासगीमध्ये बोलताना पडळकर यांच्याविषयी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्तकेली आहे. या वक्तव्याविरोधात आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी ते नेतेही या मार्चात सहभागी होतील, अशी अपेक्षा असल्याचेही देवराज पाटील यांनी सांगितले.