Nilesh Rane aggressive over Rahul Gandhi Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary controversial post
सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण राज्यसह देशभरामध्ये साजरी करण्यात आली. मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये जाणता राजाला अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या. मात्र कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर छत्रपती शिवरायांना जयंतीदिनी श्रद्धांजली वाहिली. यामुळे सत्ताधारी नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या ट्वीटचा खरपूस समाचार घेत माफी मागण्याची मागणी केली आहे. आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्गामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवजयंती साजरी करण्याबाबत सांगितले की, “मी दरवर्षी शिवप्रेमी म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्यावर येतो. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे दैवत आहेत. हा उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे,” असे मत निलेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार निलेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, “खरंतर राहुल गांधी जे भाषण करतायेत ते मानसिक संतुलन बिघडल्यासारखं आहे. ते जे भाषण करतात ते चायनाच्या फेवरमध्ये करतात. आपल्या देशाचं काहीतरी चांगलं व्हावं असं त्यांना वाटत नाही. ते परदेशात जरी गेले तरी भारताची बदनामी करतात. मुळात राहुल गांधी हा फॉरेनर आहे, भारतीय नाही. फक्त त्याचा पासपोर्ट भारतीय आहे,” असा घणाघात आमदार निलेश राणे यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “ज्याला आदरांजली आणि श्रद्धांजली यातील फरक माहित नाही, संस्कृती माहित नाही, राजे माहीत नाहीत, आपला इतिहास माहीत नाही आणि कोणीतरी त्याला ट्विट लिहून देते. या व्यक्तीबरोबर मी काम केलं आहे. नेता बनवण्याची एकही कॉलिटी त्याच्याकडे नाही. त्याच्याकडे अभ्यास नाही. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विषयाचा अभ्यास करावा लागतो. त्यांच्याकडे कुठलीच क्वालिटी नसल्याने त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने माफी मागायला हवी,” अशी मागणी शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केली आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यांची ही पोस्ट भरकटली आहे. जयंतीदिनी त्यांनी शिवरायांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील,” अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना त्यांनी श्रद्धांजली वाहिल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे.