
तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या घडामोड्या; नितीन नबीन यांनी मंजूर केला अण्णामलाई यांचा राजीनामा
चेन्नई : तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी राजीनामा दिला होता. आता हा राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी मंजूर केला आहे. अण्णामलाई यांना तामिळनाडूच्या राजकारणात स्वतंत्रपणे काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले आहे.
अण्णामलाई शुक्रवारी सोशल मीडियावर आपल्या समर्थकांना संबोधित करणार आहेत. अण्णामलाई यांना तामिळनाडूच्या राजकारणाती स्वतंत्रपणे काम करण्याची इच्छा आहे. अण्णामलाई यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी भाजपने त्यांच्या राजीनाम्याबद्दल माहिती दिली असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचे म्हटले आहे. अण्णामलाई यांनी मूळतः आपला राजीनामा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे सादर केला होता, परंतु गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर त्यांनी तो स्थगित ठेवण्यात येईल, असे सांगितले होते.
दरम्यान, भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या यादीत के. अण्णामलाई यांचे नाव नसल्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारला जाईल, अशी जोरदार चर्चा होती. अण्णामलाई यांना आंध्र प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा होती. परंतु शेवटच्या क्षणी भाजपने आपल्या कोट्यातील जागा तेलगू देसम पक्षाला दिली. अण्णामलाई राज्यसभेत जाण्यास तयार नव्हते. तामिळनाडूच्या राजकारणात त्यांना मोठी जबाबदारी हवी होती. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला आहे.
अण्णामलाई माजी IPS अधिकारी
अण्णामलाई हे कर्नाटक केडरचे माजी आयपीएस अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते भाजपमध्ये सामील झाले आणि प्रथम तामिळनाडूचे उपाध्यक्ष आणि नंतर प्रदेशाध्यक्ष बनले.
के. अण्णामलाई यांचा राजकीय प्रवास
– २०११ : के. अण्णामलाई यूपीएसपी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी बनले.
– २०१९ : अण्णामलाई यांनी आपल्या आयपीएस पदाचा राजीनामा दिला.
– २०२० : अण्णामलाई भाजपमध्ये सामील झाले आणि प्रदेशाध्यक्ष बनले.
– २०२१ : तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवली आणि पराभूत झाले.