Oxygen production projects in Maharashtra shut down amid HMPV virus crisis
पुणे : कोरोना व्हायरस नंतर जग आता नवीन एचएमपीव्ही व्हायरसच्या संकट छायेत आहे. चीनमधून आलेल्या या व्हायरसचे भारतातही आतापर्यंत सात बाधित रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना काळात आणीबाणीची परिस्थिती अनुभवल्यानंतर पुणे महापालिकेसह जिल्ह्यातील विविध रुग्णालयात एकूण ६० प्रकल्प उभारण्यात आले होते. मात्र, यातील १९ प्रकल्प सद्यस्थितीत बंद आहेत. हे बंद असलेले ऑक्सिजन प्रकल्प एचएमपीव्ही व्हायरसचे संकट ओळखून तात्काळ सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केली आहे. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे देण्यात आले. यावेळी पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस कृष्णा साठे, ज्ञानेश्वर जाधव हे उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
कोरोना काळात कोव्हीड बाधितांमध्ये गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती. रुग्ण संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने शहरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. विविध उपाययोजना करून, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करून, ऑक्सिजन वाहतुकीसाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ करून ऑक्सिजन पुरवठा मार्गी लावण्यात आला होता.
मात्र, यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून महापालिकेसह इतर शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची सुरुवात ही झाली. यासाठी महापालिका, जिल्हा नियोजन समितीने आर्थिक तरतूद केली. तसेच त्यावेळी नगरसेवकांनी आपला निधी वर्ग केला. अन्य काही लोकप्रतिनिधी, आमदारांनीही निधी दिला. काही कंपन्यांनीही सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) हे प्रकल्प उभारण्यासाठी मदत केली. अत्यंत कमी वेळेत हे प्रकल्प उभे राहिले. मात्र, ते सध्या बंद आहेत. महापालिका, रेल्वे रुग्णालय आणि ससून रुग्णालयामध्ये एकूण अठरा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले होते. त्यापैकी सध्या तेरा प्रकल्प सुरु असल्याची माहिती आहे. बंद असलेले प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची मागणीही महापालिका आयुक्तांकडे सुरवसे पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
आकडेवारी :
“जिल्ह्यातील एकूण ६० पैकी महापालिका क्षेत्रात एकूण १८ प्रकल्प आहेत. यापैकी १३ सुरु असून उर्वरित ५ बंद आहेत. त्यामध्ये पुणे महानगर पालिका, ससून रुग्णालय आणि रेल्वे रुग्णालय आदींचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अखत्यारीत ३७ ऑक्सिजन प्रकल्प आहेत. त्यापैकी २३ सुरु आहेत. एचएमपीव्ही व्हायरसचा संभाव्य धोका ओळखून सरकारने व प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. बंद अवस्थेतील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ सुरु होणे गरजेचे आहे,” असे मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.