
Pradnya Satav join BJP wife of late leader Rajiv Satav major blow to Maharashtra Congress
दिवंगत खासदार राजीव सातव यांची कॉंग्रेससोबत नाळ जोडलेली होती. राजीव सातव यांचे प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत जवळचे आणि कौटुंबिक संबंध होते. कॉंग्रेसची छाप महाराष्ट्रामध्ये रुजवण्यामध्ये राजीव सातव यांनी अनेक कष्ट घेतले. महाराष्ट्रातील प्रभावशाली कॉंग्रेस नेते म्हणून राजीव सातव यांची ओळख होती. त्यांच्या मृत्यूनंतर राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या सक्रीय होत्या. हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रज्ञा सातव यांचा मोठा प्रस्त असून त्यांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर २०२१ मध्ये शरद रणपिसे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्या पहिल्यांदा विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने त्यांना संधी दिली आणि त्या दुसऱ्यांदा आमदार झाल्या.
हे देखील वाचा : काँग्रेसला धक्का ! प्रज्ञा सातव यांच्यानंतर आता ‘या’ बड्या नेत्याने शेकडो कार्यकर्त्यांसह केला भाजपमध्ये प्रवेश
राजीव सातव यांच्या राजकीय वाटचालीमध्ये पत्नी प्रज्ञा सातव यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी देखील राजीव यांची साथ देत शेतकरी आणि शेतमजूर यांच्यासाठी काम केले. हिंगोलीतील शेतकऱ्यांसाठी सातव मदतीचा हात होते. सातव यांचे हिंगोलीच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका होती. एवढी की २०१४ च्या मोदी लाटेतही महाराष्ट्रातून निवडून आलेल्या दोन काँग्रेस खासदारांपैकी राजीव सातव एक होते. प्रज्ञा सातव यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. गांधी घराण्याच्या विश्वासू कुटुंबातील सदस्य अशी ओळख असलेल्या प्रज्ञा सातव यांनी आता २०३० पर्यंतचा कार्यकाळ शिल्लक असताना आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा कॉंग्रेससाठी महाराष्ट्रातून मोठा धक्का मानला जात आहे.
हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीस सर्वांचा टप्पाटप्प्याने कार्यक्रम करणार…! खासदार संजय राऊतांचा इशारा
प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर जोरदार चर्चा सुरु झाली. याबाबत भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, हिंगोली हा जिल्हा अनेक वर्षांपासून विकासापासून काहीसा दूर राहिला आहे. स्व. राजीव सातव यांनी या जिल्ह्यासाठी मोठे स्वप्न पाहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘विकसित भारत’ आणि ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पात हिंगोलीला अग्रस्थानी नेण्यासाठी प्रज्ञाताईंनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्याला गती मिळाली आहे, आता राजकीय पाठबळामुळे हा विकास अधिक वेगाने होईल, अशी प्रतिक्रिया प्रज्ञा सातव यांनी दिली आहे.