काँग्रेसला धक्का ! प्रज्ञा सातव यांच्यानंतर आता 'या' बड्या नेत्याने शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार दिलीप माने यांचा अखेर भाजप प्रवेश झाला. दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता आमदार सुभाष देशमुख आणि दिलीप माने यांच्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचणार की शमणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
माजी आमदार दिलीप माने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते गुरुवारी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेदेखील वाचा : नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण…; सतेज पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन
दिलीप माने हे राज्यातील अनुभवी व अभ्यासू राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक वर्षे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात काम केले असून, आमदार म्हणून त्यांनी मतदारसंघातील विकासकामे, सामाजिक प्रश्न आणि जनतेच्या समस्या विधानसभेत प्रभावीपणे मांडल्या. ग्रामीण विकास, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि शेतकरी प्रश्नांवर त्यांचा विशेष भर राहिला आहे.
…म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतला निर्णय
पक्षप्रवेशानंतर दिलीप माने म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात होत असलेले विकासकार्य, तसेच महाराष्ट्रात भाजपच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजना यामुळे प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आता भाजपसोबत काम करणार आहे.”
अनुभव आणि जनसंपर्क भाजपसाठी निश्चितच ठरेल उपयुक्त
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलीप माने यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, “दिलीप माने यांचा राजकीय अनुभव आणि जनसंपर्क भाजपसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट होईल.” चंद्रशेखर बावनकुळे यांनीही माने यांचे स्वागत करत आगामी काळात संघटनात्मक बांधणी व जनतेच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू
दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशामुळे संबंधित मतदारसंघासह राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
देशमुख गटाचा दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध
आमदार सुभाष देशमुख गटाचा दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशला तीव्र विरोध होता. आमदार देशमुख समर्थक यांनी माने यांच्या विरोधात भाजप कार्यालयासमोर ठिय्या मांडून पक्ष प्रवेश विरोध केला होता. नुकतेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यस्थी करत दिलीप माने यांचा पक्ष प्रवेश पार पाडला.






