
: मोदींच्या फोटोवरून राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार
Raj Thackeray on PM Modi : मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी पुण्यातील एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्य कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढल्याच्या प्रकरणावरून भाजप आणि मनसेमध्ये वाद निर्माण झाला होता. भाजप युवा मोर्चाने या कृतीचा निषेध करत अमित ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. आता या प्रकरणावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भूमिका मांडली असून भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंनी अमित ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करताना सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असायला हवा, मात्र तो छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांसारख्या महापुरुषांच्या रांगेत लावू नये, असं मत व्यक्त केलं होतं.
यावर आशिष शेलार यांनी महापुरुषांबद्दल प्रत्येक नागरिकाने सन्मान व्यक्त केला पाहिजे, ही भाजपची भूमिका असल्याचं सांगितलं. मात्र, या मुद्द्यावर मनसेने राजकारण करून ‘खोटी मानसिकता’ दाखवल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचं उत्तर राज ठाकरे देणार का, असा थेट सवालही शेलारांनी केला.
आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले कि, “छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सर्व मंडळींच्या रांगेत दुसरं कोणी बसू शकत नाही. सरकारी कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असायला पाहिजे का? तर असायला पाहिजे. लावला पाहिजे का? तर हो, लावला पाहिजे. ते पंतप्रधान आहेत. बाकी मतभेद शंभर असतील, पण दुसऱ्या भिंतीवरती. त्या रांगेत नाही.”
“मला असं वाटतं की, जी सरकारी आस्थापने आहेत, शाळा आहेत किंवा इतर काही संस्था आहेत, त्यांनी फोटो लावावेत. फक्त ही गोष्ट त्यांनी नीट पाळणं गरजेचं आहे की, कोणाबरोबर कुठले फोटो लागले पाहिजेत आणि कुठल्या रांगेमध्ये कोणाचे फोटो असले पाहिजेत.”
“पंतप्रधान असतील, कोणी असेल, त्यांचे फोटो कोणत्या रांगेत आणि भिंतीवरती कुठे लागले पाहिजेत, हे मला वाटतं कोर्टामध्ये देखील कळलं पाहिजे आणि इतर शैक्षणिक आणि आस्थापनांमध्ये देखील कळलं पाहिजे. त्यामुळे आत्ताच सुधारून घ्या,” असं ते म्हणाले.
यावर प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. राज ठाकरेंचे फोटो शिवाजी महाराज आणि इतर नेत्यांच्या पंक्तीत लावले जातात, त्याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार, असा सवाल त्यांनी केला. अशा फोटोवर कारवाई केली तरच राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका प्रत्यक्षात सार्थ ठरेल, असं शेलार म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींबाबत स्पष्ट भूमिका मांडताना त्यांचे फोटो सरकारी कार्यालयांमध्ये असायला हवेत, असं म्हटलं होतं. मात्र महापुरुषांच्या पंक्तीत पंतप्रधानांचा फोटो लावण्यास त्यांनी आक्षेप घेतला.
पुण्यातील गणेशोत्सवातील DJच्या मुद्द्यावरही आशिष शेलार यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने DJ संदर्भातील नियम स्पष्ट केले आहेत. प्रशासन त्यानुसार कारवाई करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र अशा विषयांवर जनतेचा सहभाग आणि चर्चेतून तोडगा काढण्याची गरज असल्याचं शेलार म्हणाले.
यावेळी शेलारांनी नागपूरच्या सुमारे 145 वर्षांच्या मारबत परंपरेचंही कौतुक केलं. समाजातील इडा-पिडा, अनिष्ट प्रथा, रोगराई आणि संकटांना दूर करण्याच्या भावनेतून ही परंपरा जोपासली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
नागपूर महापालिकाही यंदा या उत्सवात सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. जनतेचा मोठा सहभाग असलेल्या पारंपरिक उत्सवांचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून उपक्रम राबवण्याचा सरकारचा मानस असल्याचंही शेलारांनी स्पष्ट केलं.