
राज ठाकरे आज मतचोरीचा पर्दाफाश करणार
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. असे असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता मतदार यादी घोटाळा उघड करणार आहेत. ते या विषयावर आज सादरीकरण करतील, अशी माहिती सध्या दिली जात आहे.
मुंबईतील रंगशारदा हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात राज ठाकरे मतदार यादीतील अनियमिततेबाचत मोठा खुलासा करणार आहेत. ते ईव्हीएम मशीन आणि मतदार यादी घोटाळ्यावर सादरीकरण सादर करतील. गेल्या काही दिवसांपासून ते निवडणूक आयोगावर जोरदार टीका करत आहेत. आयोगाने मतदार यादीत छेडछाड केल्याचा त्यांचा आरोप आहे. ते यासंदर्भात काही व्हिडिओ पुरावेही दाखवतील.
हेदेखील वाचा : Mahavikas Aghadi Rally: ‘ही सत्तेची लढाई नाही, सत्याची लढाई…’; महाविकास आघाडीसह ठाकरे बंधू मुंबईच्या रस्त्यांवर उतरणार
दरम्यान, राज्यात अनेक बोगस मतदार असल्याचा दावा राज ठाकरे यांनी अलिकडेच केला होता. राज्यातील मतदार यादीत ९६ लाख बोगस मतदार आहेत. या गंभीर विषयाबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि निवडणूक आयोग मतदारयाद्यांमध्ये फेरफार करत आहे हे स्पष्ट करण्यासाठी, मनसेने ‘सत्याचा मोर्चा’ची पूर्ण तयारी केली आहे. १ नोव्हेंबरला होणारा हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक
एक नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाची रणनीती आखण्यासाठी गुरुवारी महाविकास आघाडीची एक महत्वाची बैठक होणार आहे. मनसेचे नेतेही या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. या मोर्चाची तयारी जोरात सुरू आहे. मुंबई आणि ठाण्यात शिवसेना (उबाठा) आणि मनसेचे बॅनर आणि पोस्टर्स दिसू लागले आहेत. त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.