निवडणूक आयोग, मतदार यादीतील घोटाळ्यांविरोधात महाविकास आघाडीची १ नोव्हेंबरल रॅली
Mahavikas Aghadi Rally : केंद्रीय निवडणूक आयोगावर सातत्याने बनावट मतदार यादी आणि मतदार यादीत फेरफाक केल्याचे गंभीर आरोप केले जात आहेत. त्यासाठी गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची भेटही घेतली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव आणि राज हे दोन्ही ठाकरे बंधू या मोर्चात एकत्र दिसणार आहेत. या मोर्चातून ठाकरेंची शक्ती दिसून येईल. ही रॅली दुपारी १ वाजता मरीन लाईन्स येथील हिंदू जिमखाना येथून सुरू होईल आणि आझाद मैदानावर संपेल.
महाराष्ट्रातील बनावट मतदारांच्या विरोधात राज्यातील विरोधी महाविकास आघाडी पक्षांनी १ नोव्हेंबर रोजी भव्य रॅलीची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत या रॅलीत एकत्र येणार आहे. या रॅलीच्या तयारीसाठी राज ठाकरे यांनी शनिवारी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी नेत्यांना महत्त्वाच्या सुचनाही दिल्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत, “महाराष्ट्रातील बनावट- बोगस मतदारांना उघड करण्यासाठी ही मोहीम आयोजित केली जात आहे. मतदार यादीतील अनियमिततेचा आवाज मुंबईच्या रस्त्यांपासून दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. हा मोर्चा न भूतो न भविष्यती झाला पाहिजे, दिल्लीपर्यंत त्याची दखल घेतली गेली पाहिजे.” मनसेकडून या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे.
महाराष्ट्रात अंदाजे ९.६ दशलक्ष बनावट मतदार आहेत. विरोधी पक्ष नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि या मुद्द्याबाबत निवेदन सादर केले, परंतु कोणतीही कारवाई केली जात नाही. आम्ही रस्त्यावर उतरून या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. योग्य मतदारांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी सत्यासाठी हा लढा आहे.” असही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काल उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. शिवसेना (उद्धव गट) नेते अनिल परब यांनी या मोर्चाच्या तयारीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. सर्व पक्षांच्या समन्वयाने आंदोलनाचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारविरोधात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), शेकाप, माकप, भाकप तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात १ नोव्हेंबर रोजी काढल्या जाणाऱ्या “सत्याच्या मोर्चा”च्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यांनी आझाद मैदान परिसरात एकत्रित पाहणी केली. या पाहणीत आमदार अनिल परब, मनसेचे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आणि खासदार अरविंद सावंत सहभागी झाले होते. पाहणीनंतर सर्व नेत्यांची एकत्र बैठक झाली आणि मोर्चाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.
१ नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा एकत्रित “सत्याचा मोर्चा” मुंबईत निघणार आहे. मनसेने यासाठी एक ग्राफिक पोस्टर जारी केले असून, त्यात “संविधान वाचवा, लोकशाही जगवा” असे आवाहन करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये नमूद केल्याप्रमाणे दुपारी १ वाजता मरीन लाईन्स येथील हिंदू जिमखाना येथे जमाव होणार असून, तिथून मोर्चाची सुरुवात केली जाईल.
मनसेच्या पोस्टरमध्ये म्हटलं आहे — “ही सत्तेची लढाई नाही, सत्याची लढाई आहे. ही खऱ्या मतदारांची लढाई आहे, खोट्या मतदारांची नाही. खोट्या मतदार यादीविरोधात या भव्य मोर्चात सर्व खरे मतदार सहभागी व्हा!” या मोर्चामुळे विरोधकांच्या एकतेला नवं बळ मिळणार का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






