'शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केली, त्यांना मंत्रिमंडळात ठेऊ नका'; कृषिमंत्र्यांबाबत राजू शेट्टी आक्रमक
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. त्यातच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यावरूनच माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्यावर शरसंधान साधलं. ‘कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केली, त्यांना मंत्रिमंडळात ठेऊ नका’, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राजू शेट्टी यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘5 मे पासून सातत्याने 3 आठवडे उत्तर महाराष्ट्रात पाऊस झाला. त्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. द्राक्ष बागेत पाणी तुंबून राहिल्याने द्राक्षाची गर्भधारणा होणार नाही. डाळिंब पिकाची फुल झडती झाली . उन्हाळी कांदा देखील खराब झाला आहे. भाजीपाल्याचे देखील नुकसान होत आहे’. कृषिमंत्री कोकाटेंबाबत राजू शेट्टी म्हणाले, ‘कृषिमंत्री नाशिक जिल्ह्याचेच आहेत. ते बेजबाबदार बोलण्याचं सोडत नाहीत. शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केली. त्यांना मंत्रिमंडळात ठेऊ नका. अजित पवार यांचेही तेच मत आहे. ओसाड गावची पाटीलकी म्हणतात. अर्थ खात्याच्या चाव्या कुणाकडे तर अजित पवारांकडे. कृषी खात्याला प्रोत्साहन दिले नाही. म्हणजे त्यांच्या नेत्यांचे अपयश कोकाटे यांनी बोलून दाखविले’.
दरम्यान, अनुदान बाजूला राहिले, हमीभाव सुद्धा मिळत नाही. शेतकऱ्यांच्या दिवसाला 8 आत्महत्या होत आहे. बेजबाबदारपणे सरकार काम करत आहे. नंदनवन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. जरा सुद्धा प्रयत्न केला नाही. जिल्हा बँकेला मदत केली असती तर फायदा झाला असता १ हजार कोटींची मदत परतीच्या बोलीवर केली होती. मदत न देता व्याज सवलत द्यायची पाटीलकीच्या भाषेत सांगितले
महाराष्ट्रात नुकसान झाल्याची संख्या कमी
महाराष्ट्रात नुकसान झाल्याची संख्या कमी आहे. पण नुकसान जास्त झाले आहे. पावसाळ्यात नुकसान होते, तसे नुकसान नाही. पण ज्यांचे झाले ते मोठे नुकसान झाले. द्राक्ष बागेचे पूर्ण वाया गेलं. कांदा हाताला लागत नाही. पैसे मिळायची वेळ आली. तेव्हा पाऊस आला. भरीव मदत व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.