जो आडवा येईल त्याला तुडविणार, तुम्ही पैलवान असलात तरी...; राजू शेट्टींचा इशारा
पुणे : सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या भागीदारीत असणाऱ्या एका कंन्स्ट्रक्शन कंपनीने पुण्यातील मोक्याची ३ हजार कोटींची जागा केवळ २३० कोटी रूपयांना हडप केल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तुम्ही पैलवान असलात तरी, मी कोल्हापूरचा आहे. जो आडवा येईल, त्याला तुडवल्याशिवाय राहणार नाही.’’ असा इशारा राजकीय नेत्याचे नाव न घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
मॉडेल कॉलनीतील एच.एन.डी. जैन बोर्डिंग आणि महावीर दिगंबर जैन मंदिराच्या विक्रीविरोधात जैन समुदायाने शुक्रवारी मोठा निषेध केला. एच.एन.डी. बोर्डिंगपासून सुरू होऊन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात संपलेल्या ‘लाँग मार्च’मध्ये आचार्य, भट्टारकांसह हजारो जैन अनुयायी सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. निदर्शनांमध्ये दिगंबर जैनाचार्य श्री गुप्तीनंदीसागरजी महाराज संघ, नांदणी मठाचे प्रमुख जिनसेन भट्टारक आणि इतर संतांनीही निषेधात भाग घेतला आणि समुदायाला पाठिंबा दिला.
निदर्शकांनी केली ही मागणी
निदर्शकांनी मागणी केली की, ही बेकायदेशीर विक्री रद्द करावी आणि ट्रस्टची पारदर्शकता सुनिश्चित करावी. वक्त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, त्यांचा या विकासाला कोणताही आक्षेप नाही, परंतु ते त्यांच्या प्रतिष्ठेच्या आणि वारशाच्या किंमतीवर तडजोड करणार नाहीत. विश्वस्तांनी खाजगी बांधकाम व्यावसायिकाशी संगनमत करून कोट्यवधी रुपयांची ही जमीन बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप आहे. ही मालमत्ता अनेक दशकांपासून दूरदूरच्या जैन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र आहे, आणि तिचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या विक्रीमुळे त्यांच्या वारसा आणि धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असेही विविध वक्त्यांनी सांगितले.
राजकीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा
यावेळी ॲड. योगेश पांडे, अण्णा पाटील, सुजाता शहा, राजेंद्र सुराणा, चंद्रकांत पाटील, ॲड. जिंतुरकर, मनीष बडजाते, शितल लोहाडे, आनंद जैन, डॉ. कल्याण गंगवाल, विलास राठोड, लक्ष्मीकांत खाबिया,वीरेंद्र शहा, भरत सुराणा, डॉ. सुजाता बरगाले, आनंद कांकरीया, नितीन जैन, स्वप्नील गंगवाल आदी उपस्थित होते. तसेच अभय छाजेड, प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, सिध्दार्थ शिरोळे, रविंद्र धंगेकर आदी राजकीय नेत्यांनी निदर्शनाला भेट देऊन पाठिंबा दिला.