
Raju Shetti, Swabhimani Shetkari Sanghatana, Koginole Toll Plaza, Farmers Protest, Maharashtra Karnataka Border,
Swabhimani Shetkari Sanghatana Protest: साखरेचा किमान विक्री दर (MSP) वाढवावा, इथेनॉलच्या दरात वाढ करावी आणि ऊस गाळप हंगाम लवकर सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर आज, १३ ऑक्टोबर रोजी हजारो शेतकऱ्यांनी कोगनोळी टोलनाक्यावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
महाराष्ट्राच्या सीमेवरील कोगनोळी टोलनाका आणि कर्नाटकमधील हत्तरगी टोलनाका येथे हजारो शेतकरी एकत्र आले आहेत. आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या दिल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी सीमा परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संबंधित तीन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
– साखरेचा किमान विक्री दर वाढवा : साखरेचा किमान विक्री दर सध्याच्या पातळीवरून प्रतिकिलो ५० रुपये करावा.
– इथेनॉलच्या दरात वाढ करा : सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा.
– ऊस उत्पादकांना अनुदान द्या : ऊस गाळप हंगाम लवकर सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे.
या मागण्यांबाबत सोमवारी दिल्लीत बैठक झाली होती. मात्र, या बैठकीत तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. राजू शेट्टी यांनी जाहीर केल्यानुसार, आज सकाळी ११ वाजल्यापासून दोन्ही राज्यांच्या सीमांवर आंदोलनाला सुरुवात झाली.
राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेच्या 140 टक्के कैदी; 60 तुरुंगांमध्ये 38 हजारांहून अधिक कैदी
केंद्र सरकारने मागण्यांबाबत लेखी निर्णय जाहीर करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. सरकारने तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच मुक्काम करण्याची तयारी केली आहे. कागल आणि निपाणी तालुक्यांतील गावांमधून आंदोलकांसाठी भाकरी आणि पिठलं गोळा केले जात आहे. टोलनाक्यावरच जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे.
साखरेच्या किमान विक्री दरात आणि इथेनॉलच्या दरात वाढ करण्याच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी नेत्यांनी साखर कारखान्यांनी बघ्याची भूमिका न घेता कारखाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, पुणे-बंगळूर महामार्ग हा महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या आंदोलनाचा परिणाम प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीवर होत आहे. केंद्र सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि आंदोलनावर तोडगा कधी निघतो, याकडे शेतकरी तसेच वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.