
Ramdas kadam on thackeray brothers
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेच्या (SIR) मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा काढणार असून, या मोर्चात इतर राजकीय पक्षांनीही सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारयांनी या मोर्चात सहभागी होण्याची भूमिका जाहीर केली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप कदम यांनी केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधू आंदोलन करत आहेत. मात्र, काँग्रेसचे अधिक खासदार निवडून आले तेव्हा ज्ञानेश कुमार यांनी गडबड केली नाही, असं उद्धव ठाकरेंना वाटतं का? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाला बदनाम करण्याच्या या प्रवृत्तीचा आपण निषेध करत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
MPSC Student Protest : पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा तापला, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा
उद्धव ठाकरेंनी जनतेच्या न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली होती. निवडणुकीत जनतेने दिलेला कौल लक्षात घ्यावा, असं कदम म्हणाले. ‘बूंद से जाती है, वो हौद से नहीं आती’, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं, असा टोलाही त्यांनी लगावला. जवळची माणसं का सोडून गेली, याचंही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला कदम यांनी दिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राची करमणूक करत असून नौटंकीच्या माध्यमातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरही रामदास कदम यांनी भाष्य केलं. राजकीय विषयात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणं योग्य नसल्याचं ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हातात घ्यावेत, त्यासाठी आपण त्यांच्यासोबत राहू, अशी भूमिका त्यांनी मांडली. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्राला बदनाम करण्याची राजकीय खेळी सुरू असल्याचा आरोपही कदम यांनी केला.
यावेळी कदम यांनी पर्यावरण मंत्री असतानाच्या काळातील मिठी नदीच्या कामांचाही उल्लेख केला. मिठी नदीच्या दोन्ही बाजूंना रस्ते, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण यासह सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केल्याचा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी दिल्यानंतर आपले निर्णय थांबवण्यात आल्याचा आरोप कदम यांनी केला.
दरम्यान, ४ ऑक्टोबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेबाबतचे आरोप आणि आयोगाची भूमिका यावरून राजकीय वाद सुरूच आहे. आयोगाने यापूर्वी निर्णयप्रक्रियेतील मतभेदांबाबत अंतिम निर्णय सर्वानुमते घेतले गेल्याचं स्पष्ट केलं आहे.