Ramesh Chennithala supports Rahul Gandhi article on Maharashtra assembly elections voting scam
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानावर आणि मतदान प्रक्रियेवर कॉंग्रेसकडून संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राची निवडणूक होऊन सहा महिने झाल्यानंतर देखील यावरुन अजूनही राजकारण रंगले आहे. याचे कारण म्हणून कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लिहिलेला लेख. राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अचानक वाढलेल्या मतदारांच्या संख्यावाढीवरुन निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आता कॉंग्रेस नेते आक्रमक भूमिका घेत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फसवणूक, हेराफेरी आणि जनादेशाचे पद्धतशीर उल्लंघन करून लोकशाहीचे वस्त्रहरण कसे केले गेले हे राहुल गांधी यांच्या लेखातून तर्कसंगत मांडणी केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच संशय बळावला असल्याने या गंभीर प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देऊन संभ्रम दूर करणे अपेक्षित असताना भाजपाकडून त्याची उत्त रे दिली जात आहेत हे आणखी गंभीर असून निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाले यावर शिक्कामोर्तब करणारे आहे,” असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रात लोकशाही मुल्यांना काळीमा फासला
पुढे रमेश चेन्नीथला म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जे घडले ते अचानक घडलेले नाही तर ते अतिशय काळजीपूर्वक आखलेले ऑपरेशन होते, लोकशाही प्रक्रियेवर एक सुनियोजित हल्ला होता. राहुल गांधी यांच्या सविस्तर खुलाशातून हे विचलित करणारे सत्य उलगडले आहे. एकेकाळी लोकशाहीचा दीपस्तंभ असलेल्या महाराष्ट्रातून लोकशाही मुल्यांना काळीमा फासला जात आहे हे विदारक आहे. निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे पण आयोगाकडून त्यावर समाधानकारक खुलासा केला जात नाही. आयोगाकडून केवळ वरवरची उत्तरे दिली जात आहेत. चंदिगड उच्च न्यायालायनेही हरियाणा विधानसभा निवडणूक प्रश्नी सीसीटीव्ही फुटेज देण्यास सांगितले असता सरकारच्या मदतीने नियम बदलून ती माहिती देता येणार नाही असा बदल करण्यात आला तो का व कशासाठी?” असा प्रश्न रमेश चेन्नीथला यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
निवडणूक आयोग करतोय लपवालपवी
पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला. बोगस मतदान करण्यात आले. मतांची टक्केवारी वाढवली. मतांची टक्केवारी सात सात दिवस जाहीर केली नाही हे सर्व संशायास्पद आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस व मित्रपक्षांना प्रचंड मोठा विजय मिळाला पण पाच महिन्यात एकदम उलट परिणाम कसे येऊ शकतात. काहीतरी काळेबेरे असल्यानेच भाजपा व निवडणूक आयोग लपवालपवी करत आहे पण हे सत्य बाहेर आणण्यासाठी काँग्रेस यापुढेही पाठपुरावा करत राहिल,” असे आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहेत.