पुण्यात थेट आदित्य ठाकरे-राज ठाकरेंचे बॅनर
MNS-Thackeray Alliance: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहु लागले असताना राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या चर्चांही जोर धरू लागल्या आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीच्या चर्चां सुरू असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांकडूनही युतीबाबत सकारात्मक प्रतिसाद असल्याचे संकेत मिळत आहेत. या चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्येही एक वेगळाच उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसत आहे. याचेच एक उदाहरण पुण्यात दिसून आले. राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे फोटो एकाच बॅनरवर पाहायला मिळाले. पुण्यात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एकाच बॅनरमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आज (9 जून) राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यानच पुण्यातील शिवसैनिकांकडून चौका-चौकामध्ये आदित्य ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एक मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांमध्ये युती होणार का? हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
Shivsena-NCP Politics: चंद्रकांत पाटलांनी डाव साधला…: शरद पवार गटाचा बडा नेता गळाला लावला
विशेष बाब म्हणजे, दोन्ही पक्षांतील काही वरिष्ठ नेत्यांनीही मनसे-ठाकरे युतीसाठी समर्थन दिले आहे., “ठाकरे बंधू एकत्र आल्यास केवळ मुंबईच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळेल,” अशा प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येत आहेत. ठाकरे गटाचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनीही यावर सकारात्मक संकेत दिले असून, “भूतकाळात डोकावण्याऐवजी आता भविष्याकडे पाहायचं आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करण्याच्या भूमिकेत आहेत, असे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे बंधूंच्या नातेवाईकांमार्फतही या संभाव्य युतीसंदर्भात हालचाली सुरू असून, दोन्ही बाजूंनी संपर्क वाढवला जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. युती झाली, तर ही दोन्ही मुंबईतील मातब्बर आणि मराठी मतदारांवर प्रभाव असलेली ताकद एकत्र येणार आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर मोठा परिणाम होऊ शकतो. राजकीय निरीक्षकांच्या मते, ही युती झाली तर भाजपसह अनेक पक्षांच्या गणितांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घडामोडींचा पुढील राजकीय दिशा ठरवण्यात महत्त्वाचा वाटा असणार आहे.