Rupali Chakankar Press Conference on Governor and Sushma Andhare Rohini Khadse meeting
मुंबई : राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून समोर येत आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील लग्न झालेल्या महिलांना पैशांसाठी सासरी दिला जाणार छळ आणि हुंडाबळी हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणामध्ये तप्तरतेने कारवाई न केल्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
महाविकास आघाडीमधील सर्व महिला नेत्या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची प्रमुख मागणी महिला नेत्यांकडून होत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संवेदनशील व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी या महिला नेत्या करत आहेत. या संदर्भात सुषमा अंधारे, रोहिणी खडसे, विद्या चव्हाण, किशोरी पेडणेकर, जयश्री शेळके, काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे. यानंतर आता रुपाली चाकणकर यांनी देखील माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाल्या चाकणकर?
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगातील रिक्त पदे भरली जातील असे आश्वासन दिले आहे. त्या म्हणाल्या की, यापूर्वी देखील अनेकांनी राज्य महिला आयोगावर टीका केली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असतानाच माजी नियुक्ती झाली होती. तेच आता म्हणत आहेत की राजकीय व्यक्ती नको, असे मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.
हे सर्व प्रसिद्धीसाठी
महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळावर टीका करताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आधी त्यांनी ठरवावं की आपल्याला काय बोलायचे आहे. सत्तेमध्ये असलं की एक मानसिकता आणि विरोधामध्ये असलं की दुसरी मानसिकता हे लोकांना सुद्धा समजत. ते लोकांना सुद्धा पटत नाही. प्रत्येकाला टीका करण्याचा आणि तक्रार करण्याचा अधिकार आहे. राज्य महिला आयोगावर टीका केल्यानंतर जर प्रसिद्धी मिळत असेल तर त्या प्रसिद्धीसाठी करतात असं मला वाटतं, असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
शिष्टमंडळाची भेट झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली का, असे विचारले असता अंधारे म्हणाल्या की, “रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासारखा छोट्या विषयासाठी आम्हाला राज्यपालांची भेट घ्यायची नव्हती. आम्ही जे विषय मांडले त्यातील सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा होता वैष्णवी हगवणे प्रकरण. पुण्यातील वैष्णवी हगवणे केसमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप आहे. प्रकरणात आम्ही ज्या आयजी जालिदंर सुपेकरांचं नाव घेत होतो, त्यांचं डिमोशन झालं. याच जालिंदर सुपेकरांचे मेव्हणे शशिकांत चव्हाण हे खडक पोलिस ठाण्यात पीआय आहेत. चव्हाण यांच्याकडे राजेंद्र हगवणे यांनी फरार होण्यासाठी ज्या चौंधे यांची थार गाडी वापरली, त्या चौंधेंच्या दोन्ही सुनांच्या तक्रारी गेल्या होत्या. याच चव्हाण यांची अरबो-खरबोच्या वेगवेगळ्या बिल्डर साईट्सची कामे सुरू आहेत. याच जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाण यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी, यासाठी आम्ही राज्यपलांकडे मागणी केली” अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी घेतली आहे.