राजकीय दललीवरुन संजय राऊत आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये जुंपली आहे (फोटो -सोशल मीडिया)
नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमुळे नेत्यांचे दौरे वाढत आहे. खासदार संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या दौऱ्यावर असताना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केले आहे. त्यानंतर आता खासदार संजय राऊत आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये वादंग निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद-विवाद सुरु असून जोरदार टीका केली जात आहे. राऊत आणि महाजन दोन्ही नेते एकमेकांना पक्षांचे दलाल असल्याची टीका करत आहेत.
खासदार संजय राऊत यांनी नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा आणि विकासकामांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले होते पण त्यांनी अनाथ आश्रम केले. शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, रस्ते पाण्याने तुंबत आहेत. कुंभसाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले. पण किती हजार कोटी रुपयांचे प्रत्यक्षात काम होणार आहे? यावर गिरीश महाजन यांनी त्यांचा पक्ष संपण्याच्या मार्गावर असून यासाठी संजय राऊतच पुरेसे आहेत, असा घणाघात गिरीश महाजन यांनी केला. यानंतर आता दोन्ही नेत्यांमध्ये वाद निर्माण झाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रद्रोही लोकांना एकत्र करून भाजप
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर शब्दांत टीका केली. राऊत म्हणाले की, टेंडरबाजीतून, खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे हे भाजपचं काम. आणि त्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत, त्यापैकी एक म्हणजे गिरीश महाजन आहेत. मला त्यांच्याविषयी फार काही बोलावं असं वाटत नाही. महाराष्ट्रातील सर्व भ्रष्ट, राष्ट्रद्रोही लोकांना एकत्र करून हा आत्ताच भाजप दिसतोय, त्यातील हे महाशय आहेत, अशा गंभीर शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री गिरीश महाजन यांनी देखील संजय राऊतांना टोला लगावला आहे. खासदार राऊत म्हणाले की, मी ऐकले ते म्हणाले दलाल आहे. त्यांनी जी बडबड केली त्यांनी जे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीवर बसवले ही दलाली पाहा. बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचे काय केले ते पाहा, शिवसेना संपवली. उद्धव ठाकरे यांना विनंती आहे थोडीफार राहिलेली शिवसेना वाचवा. राऊतांची बडबड अशी सुरु राहिली तर राहिलेली शिवसेना सुद्धा संपेल. पक्ष कोणाच्या दावणीला बाधायचं काम मी करत नाही, असे प्रत्युत्तर भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. त्यामुळे आता भाजप नेते गिरीश महाजन आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेला दिसून येत आहे.