
Sandeep Deshpande on upset in MNS leaving Raj Thackeray bmc elections 2026
मनसे नेते संदीप देशपांडे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. संतोष धुरी यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांचे नाव घेतल्यामुळे संदीप देशपांडे देखील राज ठाकरेंची साथ सोडणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कालपासून माध्यमांमध्ये बातम्या चालत आहेत की संदीप देशपांडे यांनी पक्ष सोडला. त्यामुळे काही गोष्टी सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी मनसेचं काम करत आहे. मनसेचंच काम मी नीट करत आहे आणि यापुढेही करत राहीन” असे मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुढे ते म्हणाले की, माझी हात जोडून विनंती आहे की अशा अफवा पसरवू नका. महापालिका निवडणुकीत मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, यासाठी मी मुंबई अध्यक्ष म्हणून काम करतोय. संतोष धुरी काय म्हणाले, हे मला माहीत नाही. पण मी माझं काम करतोय” अशी स्पष्ट भूमिका संदीप देशपांडे यांनी घेतली आहे. त्यामुळे चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
पुढे ते म्हणाले की, “2012 मध्ये सर्वांना डावलून मला तिकिट दिलं, त्यावेळीसुद्धा अनेकजण इच्छुक होते. पण पक्षाने त्यावेळी मला संधी दिली. ठाकरे हा ब्रँड नाही तर ठाकरे हा विचार आहे. पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं युती केली आहे. या प्रक्रियेत काही जागा मिळतात, काही नाही. आम्ही समजावण्याचा प्रयत्न करत आहोत.” असे देखील संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये कोणाचा राहणार वरचश्मा? भाजपा आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुसंडी मारायचे प्लॅनिंग
त्याचबरोबर संतोष धुरी यांनी पक्ष सोडताना बाळा नांदगावकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. मनसेमध्ये बाळा नांदगावकर बडवा आणि कटकारस्थानी आहे, असा आरोप धुरी यांनी केला होता. यावर संदीप देशपांडे यांनी मत मांडले. ते म्हणाले की, “संतोष धुरी काय बोलत आहेत, यावर मला प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. त्यांचा एक दृष्टीकोन असू शकतो. माझाही वेगळा दृष्टीकोन आहे. ते त्यांच्या दृष्टीकोनातून बोलतात आणि मी माझ्या दृष्टीकोनातून बोलतो. संतोष धुरी यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे, आता हा निर्णय चुकीचा आहे की बरोबर, हे येणारा काळच ठरवेल.” असे थेट आव्हान संदीप देशपांडे यांनी पक्ष सोडून गेलेल्या संतोष धुरी यांना दिले आहे.