ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे अखेरचा श्वास घेतला. डॉ. गाडगीळ यांचे बुधवारी (दि.7) रात्री 11 वाजता निधन झाले. डॉ. गाडगीळ यांच्या निधनाने दु:ख व्यक्त केले जात आहे. माधव गाडगीळ यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारतातील पर्यावरणशास्त्राच्या क्षेत्रातील एक अत्यंत प्रसिद्ध असे डॉ. माधव गाडगीळ हे नाव होते. पश्चिम घाट संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या गाडगीळ समितीच्या अहवालामुळे देशभरात मोठी चर्चा झाली होती. पश्चिम घाटातील जैवविविधता, निसर्गसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि स्थानिक समुदायांच्या सहभागावर आधारित विकासाचा त्यांनी सातत्याने आग्रह धरला. डॉ. गाडगीळ यांचे शिक्षण एम. एस्सी., पीएच. डी. झाले असून, ‘हार्वर्ड’चे माजी विद्यार्थीही होते.
हेदेखील वाचा : महिलांसाठी देशातील सुरक्षित शहर कोणते? ‘या’ शहराने पटकावला 1 ला नंबर; मुंबई, पुण्याचे स्थान काय?
डॉ. गाडगीळ यांची भारतीय पर्यावरणशास्त्रज्ञ, लेखक, स्तंभलेखक म्हणूनही ओळख आहे. संस्थापक, पर्यावरण विज्ञान केंद्र – भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू राहिले आहेत. तसेच पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे माजी सदस्यपदही त्यांनी भूषवले आहे. जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक प्रखर आवाज, अभ्यासू मार्गदर्शक आणि संवेदनशील शास्त्रज्ञ देशाने गमावला आहे.
डॉ. माधव गाडगीळ यांचा अल्पपरिचय…
एम. एस्सी., पीएच. डी., ‘हार्वर्ड’चे माजी विद्यार्थी
भारतीय पर्यावरणशास्त्रज्ञ, लेखक, स्तंभलेखक
संस्थापक, पर्यावरण विज्ञान केंद्र – भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू
पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे माजी सदस्य
२०१०च्या ‘वेस्टर्न घाट इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनेल’ (WGEEP)चे प्रमुख, ज्याला ‘गाडगीळ आयोग’ म्हणून ओळखले जाते.
‘व्होल्वो पर्यावरण पुरस्कार’ आणि पर्यावरणीय कामगिरीसाठी ‘टायलर पुरस्कार’ प्राप्तकर्ता
चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार १९८१ मध्ये ‘पद्मश्री’ आणि त्यानंतर २००६ मध्ये तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ‘पद्मभूषण’
२०२२ चा ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’
२०२४चा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा ‘संयुक्त राष्ट्रसंघा’चा सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान






