Sanjay Raut alleges that Ravindra Dhangekar left Congress because of allegations against his wife
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून महायुतीचा विजय झाला. यामुळे महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षांची वाट धरली आहे. पुण्यामध्ये देखील कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील कॉंग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी कॉंग्रेसला रामराम करत पक्षांतर केले आहे. रवींद्र धंगेकर यांनी हाती शिवधनुष्य घेत शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आता खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. पुण्यामध्ये कॉंग्रेसला मोठा सुरुंग लागल्यामुळे त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “रविंद्र धंगेकर हे सुरूवातील शिवसेनेमध्ये होते, नंतर ते मनसेत गेले, पुढे काँग्रेसमध्ये गेले आणि काल त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. ते चांगले कार्यकर्ते आहेत. पण त्यांनी सांगितलं की विकासकामं होत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहेत, म्हणून मी शिंदे गटात चाललो आहे. पण मला एक कळत नाही की शिंदे गटात गेल्यामुळे महाराष्ट्रातील किंवा त्यांच्या कसबा मतदार संघातील कोणती विकासकामं मार्गी लागणार आहेत?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “अजित पवारांच्या गटात, शिंदे गटात हे जे प्रवेश सुरू आहेत ते सरळसरळ भीतीपोटी प्रवेश झाले आहेत. स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांची लोकं यांनी देखील भीतीपोटीच पक्षांतर केलं. अजित पवारांनीही किंवा आमच्या पक्षातून जे लोकं भाजपमध्ये गेले, त्यांनीही भीतीपोटीच पक्ष सोडला. एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्यांची आर्थिक कोंडी केली जाते, आणि त्यांच्या विरोधात काही प्रकरणं असली तर दबाव आणला जातो” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“रविंद्र वायकरांचंसुद्धा असंच एक प्रकरण होतं. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांनी पक्षांतर केल्यावर ताबडतोब 24 तासांच त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले, आता रविंद्र धंगेकरांसारखा कार्यकर्ता फोडण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लावण्यात आली, खोटे गुन्हे टाकण्यात आले. धंगेकरांनी पक्ष सोडावा असं वातावरण तयार करण्यात आलं, त्यांची कोंडी करण्यात आली, त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी भीती दाखवण्यात आली. त्याच भीतीपोटी, विकासकामं रखडली या सबबीखाली रविंद्र धंगेकर हे शिंदे गटात गेले. रविंद्र धंगेकर खरोखर का गेले? हे त्यांनी त्यांच्या दैवताला स्मरून खरोखर सांगावं,” असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.