हातात चाकू घेऊन फिरणाऱ्यांना नागरिकांनी चांगलंच चोपलं; तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं(Photo : iStock)
पेण : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील दुरशेत जंगल भागातील रस्त्यावर एका महिलेचा बॅगेत मृतदेह सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कोणीतरी बाहेरून घेऊन येऊन या परिसरात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा पेण पोलिस अधिक तपास करत आहेत.
पेण तालुक्यातील दुरशेत फाटा येथून उग्र वास येत होता. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी आसपासच्या परिसरात शोधाशोध सुरु केली होती. प्राथमिकपणे, कोणते जनावर मृत झाले का? याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यानुसार, ग्रामस्थांकडून शोधमोहीमही सुरु होती. मात्र, बाळगंगा नदी किनारी एक भलीमोठी काळी सुटकेस आढळून आली. याच सुटकेसमधून उग्रवास येत होता. ही सुटकेस पाहिली असता एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
दरम्यान, याप्रकरणी पेण पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
अज्ञांताविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. साधारणपणे चार ते पाच दिवसांपूर्वी या महिलेचा खून करून मृतदेह बॅगेमध्ये भरून दूरशेत येथे टाकण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता पेणमध्ये एका बॅगेत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.