sanjay raut target prakash ambedkar
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती खालावली होती. त्यांना तातडीने पुण्यातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओप्लास्टी आणि एन्जिओग्राफी करण्यात आली. यानंतर आता रुग्णालयामधून प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ओबीसी आरक्षण संपवणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यावर आता ठाकरे गटाने देखील प्रत्युत्तर दिले आहे.
ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, “सगळ्यात आधी बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांची प्रकृती आराम पडावा त्यासाठी शुभेच्छा देतो. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे, काळजी आहे.ते या राज्याची नेते आहेत. त्यांचे वक्तव्य मला कोणीतरी सांगितलं, पण ते सत्त्यावर आधारित नाही. कोणत्या प्रकारचा आरक्षणाला कोणी हात लावणार नाही,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार…; ICU मधून प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा
पुढे संजय राऊत म्हणाले की, “आंबेडकर साहेबांनी भ्रम निर्माण करणारी वक्तव्य ICU मधून करू नये. त्यांनी आधी स्वतःची प्रकृती सांभाळावी, ते ICU मध्ये आहेत, छातीवर ताण येईल अशी वक्तव्य त्यांनी ICU मधून करू नये. ही खूप नाजूक शस्त्रक्रिया असते मी त्यातून दोन-तीन वेळा गेलोलो आहे. त्यांनी जास्त बोलू नये. पुढचे सात आठ दिवस त्यांनी खूप कमी बोललो पाहिजे असा वैद्यकीय सल्ला असतो. या प्रकरणांमध्ये त्यांनी आधी आपली प्रगती सांभाळावी महाराष्ट्र आम्ही सांभाळतो,”अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते आयसीयुमध्ये असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत की, “यंदाची ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा. दुसऱ्या बाजूला एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा,” असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.