
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पवारांनी आपल्या पत्रात शेतकरी आणि ग्रामीण भागातील परिस्थितीबाबत विविध मागण्या मांडल्या आहेत.
पवारांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जमाफी, पीकविमा आणि इतर उपाययोजनांची मागणी केली आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडदासह विविध पिकांवर परिणाम झाल्याचा उल्लेख त्यांच्या पत्रात करण्यात आला आहे.
शरद पवारांच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारने आधीच उपाययोजनांची तयारी सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं.
५ ऑक्टोबरनंतर दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे करण्यात येणार असून, त्याआधारे केंद्र सरकारकडे NDRF अंतर्गत मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
मात्र, केंद्राच्या मदतीची वाट पाहत शेतकऱ्यांना मदत देण्यास विलंब केला जाणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. राज्य सरकारच्या निधीतून आधी मदत देण्यात येईल आणि त्यानंतर NDRFकडून मिळणाऱ्या निधीतून हा खर्च भरून काढण्याची प्रक्रिया केली जाईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि गरज असलेल्या भागात चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सरकारकडून करण्यात येत आहे. राज्यातील पावसाची स्थिती आणि त्याचा शेतीवर झालेला परिणाम सरकार गांभीर्याने पाहत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, शरद पवारांनी आपल्या पत्रात दुष्काळग्रस्त भागांसाठी तातडीने मदत करण्याबरोबरच कर्जमाफी आणि पीकविमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रतिहेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत देण्याची मागणीही केली आहे.
‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला
शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी सरकारला काही सूचना केल्या आहेत. या पत्राला राजकीय रंग न देता त्यातील सूचनांचा विचार केला जाईल, अशी भूमिका फडणवीसांनी मांडल्याचं वृत्त आहे. पुढेही पवारांकडून काही सूचना आल्यास त्या ऐकून घेतल्या जातील, असा त्यांचा सूर आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय चर्चा रंगली असली तरी, सध्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी आणि किती मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.