नागपूर : राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीकडे एकहाती सत्ता आल्यानंतर देखील सरकार स्थापना व मंत्रिमंडळ विस्तार अशा अनेक बाबींमुळे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी देखील खातेवाटप झालेले नाही. मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे शिंदे गटातील अनेक नेते नाराज झाले आहेत. यामध्ये तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर त्यांच्याबरोबर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे मंत्रिपद न दिल्यामुळे नाराज आहेत. यावर आता शिंदे गटाचे नेते व आमदार उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच मंत्रिपद देताना पक्षातील नेत्यांचा कस लागतो असे देखील वक्तव्य उदय सामंत यांनी केले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच नाराज नेत्यांच्या मागणीवर देखील भाष्य केले आहे. शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत हे तर मंत्रिपद न मिळाल्यामुळे नागपूरचे अधिवेशन सोडून पुण्याला आले आहेत. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, आमचे ५७ आमदार आहेत आणि ११, १२ मंत्रिपदं आम्हाला मिळाली आहेत. अशा वेळी कोणाला मंत्रिपद द्यायचं आणि कोणाला नाही हे ठरवताना नेत्यांचा कस लागतो”, असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच पुढे राजकीय नाराजीनाट्यावर उदय सामंत म्हणाले आहे की, “एखाद्या नेत्याला मंत्रिपद मिळालं नाही तर तो नाराज होऊ शकतो. एकनाथ शिंदे त्यांची नाराजी दूर करतील. तसेच जे मंत्री झालेत त्यांच्यामध्ये कोणाची काही नाराजी असेल तर ती देखील दूर करणं आवश्यक आहे. आम्ही शिवसेना म्हणून विस्ताराने त्यावर काम करत आहोत. शिवसेनेत यावर चर्चा होत आहे. तानाजी सावंत, विजय शिवतारे ही शिवसेनेतील ज्येष्ठ मंडळी आहे. दोघेही मंत्री होते, त्यांना लवकरात लवकर आमचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री बोलावून घेतील आणि त्यांची समजूत काढतील. परंतु, तुम्हा प्रसारमाध्यमांच्या मनात आहे ते या दोघांच्या मनात नसेल, याची मी सर्वांना खात्री देतो”. असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे उदय सामंत म्हणाले की, “आमचे इतर आमदारही मंत्रिपदासाठी पात्र आहेत. परंतु, आम्हाला ११ ते १२ मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यापैकी मंत्रिपद कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे. अशावेळी वरिष्ठांचा कस लागतो. त्यानंतर कोणी नाराज असतील तर त्यात वरिष्ठांचा दोष नसतो. मी चांगलं काम केलं नाही तर अडीच वर्षानंतर माझ्या जागी दुसऱ्या नेत्याला मंत्री केलं जाईल असं सांगितलं जात आहे. परंतु, अडीच वर्षे कशाला, मी जर चांगलं काम करत नसेल तर दोन-तीन महिन्यांत देखील माझं मंत्रिपद काढून घेतलं जाऊ शकतं. दोन-तीन महिन्यात चांगलं काम केलं नाही तर आमचे नेते आमचं मंत्रिपद काढून घेऊ शकतात, याची आमच्या मनात भीती आहे. त्यामुळे आम्हाला जनतेला अभिप्रेत असं काम करावं लागेल. सर्व नेत्यांना आमदारांना बरोबर घेऊन काम करावं लागेल. महायुतीला न्याय द्यावा लागेल”, असे मत शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.